Marathi e-Batmya

शरद पवार यांचा अंदाज, या तारखेला मतदान पार पडलेले असेल….

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता आणि निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांसह भाजपा आणि महायुतीतील पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांकडून आशा होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी लेव्हल प्लेईंग फिल्ड ची संधी देणार असल्याचे सांगत फक्त दोन दिवस आढावा घेतल्याचे सांगितले.

त्यानंतर राज्यातील निवडणूका दिवाळीनंतरच होणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. या शक्यतेवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या अंदाजाने राज्यातील विधानसभा निवडणूकीबाबतही अनेकांकडून अटकळ बांधण्यात येत आहे.

आज अकलूज आणि माळशिरस दौऱ्यावर शरद पवार हे आले होते. यावेळी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहु महाराज हे ही उपस्थित होते. तसेच एकेकाळचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले मोहिते-पाटील कुटुंबातील अनेक नेतेही यावेळी शरद पवार यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझा अंदाज आहे की, ६ ते १० ऑक्टोंबर दरम्यान, निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेईल, आणि निवडणूकीच्या तारखा जाहिर करेल. त्यानंतर आचारसंहितेची तारीख जाहिर करेल. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा जाहिर करून १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडेल अशी शक्यता व्यक्त केली.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजपा आणि महायुतीच्या दाव्यानुसार दिवाळीनंतर विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया पार पडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच तोच काळ भाजपाला अनुकूल असल्याने छट पूजा आणि देवदिवाळी सारख्या सण असल्याने त्यानंतर मतदान घेण्याची योजना भाजपाच्या श्रेष्ठींचीही आहे.

Exit mobile version