Breaking News

शरद पवार यांचा टोला, हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटकती आत्मा टीकेला प्रत्युत्तर

मोदींचा प्रचार हा मी काही सांगायची आवश्यकता नाही. पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते? पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. अपेक्षा अशी असते की देशाच्या पंतप्रधान यांनी देशातील सर्व जाती, धर्म, भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे, पण हे करायला मोदी विसरले. विसरले असं मला वाटत नाही, त्यांनी ते मुद्दाम केलं. त्यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते बरंच झालं. त्यांच्या प्रमाणे आत्मा कायम राहतो, हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्ष स्थापनेच्या निमित्ताने अहमदनगर येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणूकीत पक्षाचे विजयी झालेले सर्व खासदार उपस्थित होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, कारण त्यांची विचारधारा ती होती. काय त्यांनी सांगितलं? अल्पसंख्यांक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे. तो मुस्लिम असेल, तो ख्रिश्चन असेल, तो शीख असेल तो पारशी असेल, तो कुठल्याही जातीचा पातीचा असेल, आज या लोकांसाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी ही राज्यकर्त्यांना करावी लागते. पण मोदी हे करण्यासाठी कमी पडले, त्यांनी एके ठिकाणी भाषण केलं. काय त्यांनी भाषण केलं? एके ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं, की या देशामध्ये ज्यांच्या घरामध्ये मुलं जास्त जन्माला येतात, असा एक वर्ग आहे. याचा अर्थ, त्यांना या देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल बोलायचं होतं, हे स्पष्ट होतं. ते म्हटले, की उद्याच्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घराच्या भगिनींचं मंगळसूत्र ते काढून घेतील, कधी घडलंय असं या देशात? असा सवाल उपस्थित करत शरद पवार पुढे म्हणाले की, एका शेतकऱ्यांच्या भेटीमध्ये, ते म्हटले यांच्या हातात सत्ता आली, तुमच्या घरी दोन म्हशी असतील त्यातील एक म्हैस ते काढून नेतील. काय बोलायचं? पंतप्रधान यांनी हे बोलायचं? पंतप्रधानांनी या प्रकारची चर्चा करायची? पण त्याचं तारतम्य बाळगण्याच्या संबंधित ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा मोदींनी पाळल्या नाहीत, अशी टीकाही यावेळी केली.

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राजकीय पक्ष आम्ही एकमेकांवर टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी? माझ्या बाबतीत बोलले की भटकती आत्मा..! माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला हा भटकता आत्मा आहे, एका दृष्टीने बरं झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणार आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली, त्यांनी राज्य केलं. मराठी माणसाना आत्मविश्वास दिला आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीसमूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे, हे पंतप्रधानांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे, की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, सत्ता जर मिळवण्याची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो, त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी दाखवली. ठीक आहे, त्यांच्याकडून झालं आपण ते विसरू या, आपण नव्या विचारांनी जाऊया, आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. संघटना मजबूत करावी लागेल, समाजातील जो दलित वर्ग आहे, अल्पसंख्यांक वर्ग आहे, महिलांचा वर्ग आहे, छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक हे करण्यासंबंधीची खबरदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. हे करणारा पक्ष कोणता? तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हा इतिहास निर्माण करायचा आहे असेही यावेळी सांगितले.

शरद पवार शेवटी म्हणाले की, निवडणुका येतील, त्या निवडणुकीला आपण सामोरे जाऊ, लोकांना बरोबर घेऊ, त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्यासंबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्यावर आपल्याला पुढे जायचं आहे. सुदैवाने या देशातील लोक मोदी सरकारने प्रश्न जे काढले, त्या प्रश्नांना फारसे लोक महत्त्व देत नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, तर लोकांच्यात चर्चा अशी होती, की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतंय? मंदिर बांधलं, आनंद आहे उद्या मी आयोध्येला गेलो, तर मंदिरात जाईन. त्या ठिकाणी रामाचा सन्मान ठेवीन. पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही. ते चुकीचं काम राजकारणासाठी मोदींनी केलं, त्याची नोंद अयोध्येतील जनतेने घेतली. राम मंदिराचे स्मरण करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता, त्याचा १००% पराभव अयोध्येतील जनतेने केला हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता त्याचा फारसा विचार करायचा नाही, असेही यावेळी सांगितले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *