Breaking News

शरद पवार यांचे निवडणूक आयोगाला पत्र, पिपाणी चिन्ह यादीतून वगळा लोकसभा निवडणूकीत पक्षाला झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर लिहिले पत्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या चिन्हाला साधर्म्य असलेल्या चिन्हाचे वाटप निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना केल्याने मोठ्या प्रमाणावर मतांचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचे मताधिक्क कमी झाले. सातारा, बारामतीसह अन्य काही मतदारसंघात अशा पध्दतीने मतांची विभागणी झाल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित साधर्म्य असलेले चिन्ह वगळण्याची मागणी केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि पक्ष नाव फुटीनंतर अजित पवार यांच्या पक्षाला दिले. त्यानंतर शरद पवार यांना त्यांच्या गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्ष नाव देत तुतारी वाजविणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले. मात्र लोकसभा निवडणूकीत तुतारीशी साधर्म्य असलेल्या पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उभे असलेल्या मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना दिले.

त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या अनेक मतदारांनी तुतारी वाजविणारा माणूस या अधिकृत चिन्हावर मतदान करण्याऐवजी पिपाणी चिन्हावर मते टाकल्याची माहिती लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर मतांच्या विभाजनातून ही माहिती पुढे आली. यात सातारा मतदारसंघात आणि बारामती, बीड लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला लाखोंनी मते मिळाल्याचे उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाच्या यादीतून पिपाणी चिन्ह वगळावे यासाठी शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची शरद पवार यांनीच एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले.

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *