Marathi e-Batmya

३२ लाख परिक्षार्थींच्या प्रश्नी शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित मागितली वेळ

राज्यातील जळपास ३२ लाख परिक्षार्थी विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी अहोरात्र अभ्यास करतो. मात्र या परिक्षार्थींच्या परिक्षा वेळेवर होत नाहीत की, झाल्यातर त्याच्या नियुक्त्या वेळेत होत नाहीत, तसेच परिक्षाच्या तारखा प्रलंबित राहणे आदी प्रश्नी परिक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होत आहे. या असंतोषातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित तातडीने व्यस्त कार्यक्रमातून भेटीची वेळ देण्याची मागणी केली.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, ऑगस्ट २०२४ मध्ये राज्य आयोगाच्या परिक्षेच्या दिवशी आयबीपीएस परिक्षा आल्याने राज्य सेवेची परिक्षा पुढे ढकलली. तसेच राज्यसेवेच्या परिक्षेत कृषीच्या २५८ जागा समाविष्ट कराव्या या मागणीसाठी परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. परंतु परिक्षा पुढे ढकलत असताना परिक्षा नेमकी कधी घेण्यात येणार आहे आणि कृषी सेवेच्या जागांबाबत राज्य सेवेकडून स्पष्टीकरण येणे अपेक्षित होते. आज तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला तरी परिक्षेच्या तारखांचा आणि कृषी पदांच्या समावेशाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यातच ऑक्टोंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असून यासंदर्भात त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.

तसेच मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शरद पवार म्हणाले की, दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात आयोजित गट ब आणि गट क पदाच्या परिक्षेबाबत अद्यापही ठोस प्रक्रिया करण्यात आलेली नाही. तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सदरील परिक्षेची जाहिरात प्रसिध्द होणे गरजेचे आहे आणि आवश्यक पदांच्या संख्येत वाढ करणे अपेक्षित असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

त्याचबरोबर शरद पवार आपल्या पत्रात म्हणाले की, राज्य कृषी सेवा, पोलिस उपनिरिक्षक, विक्रीकर सहाय्यक, वैगेर सरळ सेवेतील अनेक पदांवर निवड होऊन बराच कालावधी झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. तरी रखडलेल्या नियुक्त्या करण्याचे आदेश त्वरीत देण्यात यावे अशी मागणीही केली.

याशिवाय लिपिक पदाकरिता ७ हजारहून अधिक जागांची भरती यासह अन्य काही भरतीप्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या आहेत. त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा, तसेच राज्यातील प्राध्यापकांच्या जागाही रिक्त आहेत. त्या रिक्त जागांचा नव्याने आढावा घेऊन शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरतीला गती द्यावी अशी मागणी केली.

राज्यातील स्पर्धा परिक्षार्थींच्या मागण्या रास्त असून यासंदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी मी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहे. परंतु अद्यापही वेळ मिळाला नाही. वाढत्या बेरोजगारीमुळे तरूणवर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता असून प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेऊनही त्यांच्या मागण्याबाबत तातडीने कार्यवाही होत नाही. तरी प्रकरणाचे गांभीर्याने स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांच्या मांगण्यासंदर्भात व्यस्त कार्यक्रमातून वेळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असेही शरद पवार यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Exit mobile version