Breaking News

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणः राणे समर्थक-ठाकरे समर्थक भिडले नारायण राणे, निलेश राणे आणि ठाकरे समर्थक आमने सामने

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विजयदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवणच्या समुद्र किनारी उभारण्यात आला. मात्र मागील आठवड्यात हा पुतळा अचानक कोसळून पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुतळा उभारलेल्या ठिकाणाला भेट दिली. मात्र महाविकास आघाडीचे नेते पोहोचण्यापूर्वी सिंधूदूर्गचे खासदार नारायण राणे हे तेथे आधीच पोहोचले. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाहताच राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात राडा झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या राजकोट या ठिकाणी उभारण्यात आला होता, त्य़ा ठिकाणी नारायण राणे हे आधीच पोहोचले होते. तसेच पुतळा परिसराची पाहणी करून ते पुतळ्याच्या चौथऱ्याच्या खालच्या बाजूस उतरून ते पुतळा परिसरातून बाहेर पडत होते. नेमक्या त्याच वेळेत महाविकास आघाडीचे नेतेही पुतळा परिसरात पोहोचले. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावेळी नारायण राणे यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चालत पुतळ्या उभारण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचले. नेमक्या त्याच वेळी नारायण राणे यांच्या समर्थकांनी ठाकरे समर्थकांच्या धुमचक्री सुरु झाली. त्यामुळे ठाकरे समर्थकही राणे समर्थकांवर शरसंधान करण्यास सुरूवात केली. यात दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी एकही सोडली जात नव्हती.

त्यावेळी पुतळ्याच्या चवथऱ्यावर ठाकरे समर्थक तर खालच्या बाजूस राणे समर्थक असा सामना सुरु झाल्याचे पाह्यला मिळाले. मात्र पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्त्ये चांगलेच आक्रमक झालेले असल्याने मध्यस्थी करण्यासाठी अर्थात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पुढे गेलेले काही पोलिस शिपाई जखमी झाले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सातत्याने नारायण राणे आणि ठाकरे समर्थकांशी बोलून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र राणे समर्थक काही केल्या ऐकायला तयार होईना. त्यातच निलेश राणे यांनीही महाविकास आघाडीच्या विशेषतः आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना पुतळ्याच्या चौथऱ्यावरून खाली उतरवा आणि त्याला आधी बाहेर काढा अशी मागणी करू लागले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे चित्रही या ठिकाणी पाह्यला मिळाले. शेवटी पोलिस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तेथून शांतपणे बाहेर पडणे पसंत केले.

त्यावेळी पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांकडून राणे पिता-पुत्रांसह त्यांच्या समर्थकांभोवती संरक्षक कडे करत राणेसह त्यांच्या समर्थकांना रोखून धरले. त्यानंतर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह कोकणातील आजी-माजी आमदार आणि समर्थक पुतळ्याच्या ठिकाणाहून बाहेर पडले.

यावेळी पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुतळा उभारलेल्या राजकोट परिसरातून बाहेर पडण्यासाठी मागील दरवाज्याने बाहेर पडण्याची विनंती केली. मात्र आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागील दारातून बाहेर पडण्यास नकार देत मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर पडले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *