Marathi e-Batmya

स्वबळाची घोषणा केली तरी ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेनेने जरी केली. तरीही ते सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका होण्यास आणखी वर्ष दिड वर्षाचा कालावधीचा अवकाश असताना भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह डाव्या पक्षांनी यापूर्वीच राजकिय बांधणीला सुरुवात केली आहे. त्याधर्तीवर शिवसेनेकडून आज वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय मेळाव्यात आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली. तसेच राज्याबरोबर देशातील सर्व निवडणूका लढविण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली.

उध्दव ठाकरे यांनी केलेल्या या घोषणेचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, राज्यात आज दिसत असलेली शिवसेना ही शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नसून जर स्वबळावर लढण्याची भाषा करता तर सरकारला असलेला पाठिंबा हिम्मत असेल तर काढा असे आव्हान देत सत्तेची उब लागलेल्या शिवसेनेला ते कदापी शक्य नसल्याचा उपरोधिक टोला लगावला.

त्याचबरोबर शेजारच्या गुजरातमध्ये पेट्रोल महाराष्ट्रापेक्षा १० रूपयाने स्वस्त मिळते. तेच पेट्रोल महाराष्ट्रात मात्र ८१ रूपयाने मिळत आहे. त्याबाबत काही शिवसेना बोलत नसल्याचा आरोप करून यांच्याकडून सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस होत नसल्याची टीकाही अजित पवार यांनी परभणी जिल्ह्यात बोलताना केली.

तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसनेही उध्दव ठाकरे यांच्या या घोषणेची खिल्ली उडवत सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शतकापर्यतची घोषणा करणाऱ्या शिवसेनेच्या अंगात धमक नाही. त्यामुळे ते फक्त घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीच नाही. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूका लढविण्याची घोषणा केली. तरी ते प्रत्यक्षात तसे करतीलच याची खात्री कोणाला नसल्याची टीका केली.

 

Exit mobile version