Breaking News

संजय राऊत यांचा गौप्यस्फोट, उध्दव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जर भाजपाने शब्द पाळला असता तर

मागील चार दिवसांपासून शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात सेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर शिवसेनेतल्या अनेक आजी-माजी आमदारांनी एकनाथ शिंदे याच्या गटात प्रवेश केला. सद्यपरिस्थितीत उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. या सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एक वक्तव्य करत मोठा गौप्यस्फोट केला.

भाजपा-शिवसेना यांच्यातील युती कायम राहिली असती तसेच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या कराराची अंमलबजावणी झाली असती तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हेच होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

एका खाजगी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपाने शब्द पाळला असता. अडीच- अडीच वर्षे सत्तेचं विभाजन हे भाजपाने पाळले असते तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. पण भाजपाने बेईमानी केली. म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि त्याच भाजपासोबत आज एकनाथ शिंदे जायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांपूर्वी एका विशिष्ट परिस्थितीत मुख्यमंत्री झाले. तीन भिन्न विचारधारेचे पक्ष सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचा अडीच वर्षांचा मुख्यमंत्री झाला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. अशा वेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते. भाजपाने शब्द पाळला नाही म्हणून युती झाली नाही. ते झालं असतं तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावं हे पक्क होतं, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला एक नवा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीत सहा ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना सोडून कोणताही राजकीय पक्ष वापरू शकत नाही, असा एक ठराव या बैठकीत समंत करण्यात आला. तसेच सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत