Breaking News

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सर्वात मोठ्या शिल्पाचे लोकार्पण ब्राँझ धातूच्या अर्ध शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकार्पण

महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील असे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी अविरत काम करू असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

यावेळी सोहळ्यास माजी मंत्री महादेव जानकार, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार प्रा.देवायानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढीकले,आमदार सरोज आहीरे,आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार,माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, प्रकाश लोंढे, विलास शिंदे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, डॉ.शेफाली भुजबळ, भाऊलाल तांबडे,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, अंबादास खैरे, उदय आहेर,डी.के.जगताप, मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, आर्किटेक्ट शाम लोंढे, कंत्राटदार पंकज काळे, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक शहरात १९३१ साली गणेशवाडीत अर्धाकृती पुतळा बसविला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्यासाठी आपल्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, १९२५ साली सत्यशोधक केशवराव जेधे व जवळकर यांनी पुणे नगरपालिकेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यात यावा त्यासाठी २० हजार रू खर्च करावा. असा ठराव नऊ सभासद यांच्या सह्यानिशी नगरपालिकडे पाठविला. पुढे तब्बल ४४ वर्ष्याच्या संघर्षनंतर ३१ मे १९६९ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे नगरपालिकेच्या प्रांगणात फुलेंचा पुतळा उभारण्यात आला. विधान भवनात फुलेंचा पुतळा बसविण्याची मागणी मुकुंद ठकोजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली व १९८२ रोजी विधानभवनाच्या प्रांगणात फुलेंचा पुतळा बसविण्यात आला.पुतळ्याचे अनावरण ए. आर. अंतुले यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा मराठा समाजाचे नेते सत्यशोधक भाई माधवराव बागल यांनी १९५० साली कोल्हापूर येथे उभारला. आंबेडकर यांच्याच हस्ते अनावरण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई नाका येथील वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे ३३६६ मीटर आकाराचे हे बेट कमी करण्यात येऊन २७१० मीटरवर आणण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली. तसेच याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत रित्या होऊन येथील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या स्मारकासाठी संकल्प चित्र तयार करण्यात आल्यानंतर पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत यावर विचार विनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहे. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगा देखील राखणे कठीण होते. त्यामुळे हे पुतळे अतिशय नेटके वाटावे त्याची व्यवस्थित निगा राखली जावी यादृष्टीने समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून ब्राँझ धातूचे देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जोतीराव ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते.जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र ब्राह्मण होते.तात्यासाहेब भिडे, आप्पासाहेब चिपळूणकर, भवाळकर,सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे “शिल्पकार” मानलेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. सन १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, “जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे ” असे म्हटले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना “समाज क्रांतिकारक” म्हणून गौरविले असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली. त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले. सन १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. प्लेगच्या साथी मध्ये त्यांनी स्वतःच्या पाठीवर रुग्णांना घेऊन जात उपचार दिले.

आजारी असतानाही मंत्री छगन भुजबळ यांची स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास हजेरी

गेल्या दोन दिवसापासून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचार सुरू आहे. मात्र आज त्यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते विशेष विमानाने येऊन उपस्थित राहीले. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचार घेण्यासाठी ते रवाना झाले.

स्मारकात या विकास कामांचा आहे समावेश……

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात उभारण्यात येत असलेल्या या स्मारकात क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या पुतळ्यांचा समावेश असणार आहे. सुमारे २७१० मीटर जागेवर हे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची १८ फुट तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची १६.५० फुट इतकी आहे. या पुतळयाच्या परिसरात विशेष अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे. तसेच स्मारकातील विद्युत रोशनाईचा वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये अशी विशेष प्रकाश योजना याठिकाणी करण्यात आली आहे. तसेच या स्मारकात सुसज्ज वाहतून बेट, पाण्याचे कारंजे निर्माण करण्यात येऊन सर्व स्मारक परिसरात गार्डन व सुशोभिकरण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालक शलाका भेंडे यांनी केले.

असे आहे स्मारकातील शिल्प –

 महात्मा फुले १८ फूट, सावित्रीबाई फुले १६.५० फूट
 दोन्ही पुतळ्याची रुंदी प्रत्येकी – १४ फूट
 महात्मा फुले पुतळा ८ वजन टन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा वजन ७ टन
 धातू – ब्रॉन्झ धातू
 पुतळ्याची निर्मिती – प्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ
 कुडाळ, रत्नागिरी, कोकण येथे निर्मिती
 पुतळे बनविण्याचा कालावधी – ११ महिने
 पुतळ्यांचा खर्च – ४ कोटी ६८ लक्ष
 हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी ८ फुट कॉंक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तसेच ३० ते ४० फूट पाईल फाऊंडेशन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत