Breaking News

सुनिल तटकरे यांचा टोला,… ठाकरेंना दिलेली सुरक्षा पाळत ठेवण्यासाठी होती का? महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी

महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी आहेत. अत्याचार करणार्‍या नराधम विकृत प्रवृत्ती ठेचून काढल्या गेल्या पाहिजेत हे पक्षाचे आणि वैयक्तिक मत आहे आणि सरकारमधील सर्व नेत्यांचेही तेच मत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना घडणे हे आपल्या समाजव्यवस्थेला कलंक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करावीच परंतु प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे राजकीय भूमिका असलीच पाहिजे असे नसावे असा टोला लगावतानाच लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

काँग्रेसने ठाकरे कुटुंबाला पाळत ठेवण्यासाठी ती सुरक्षा दिली होती का?…

शरद पवार यांना पुरविण्यात आलेल्या झेड सुरक्षेबाबत विचारले असता सुनिल तटकरे म्हणाले की, वैचारिक दिवाळखोरीत गेलेले संजय राऊत किंवा रोहित पवार त्यांच्या या वैचारिक कुवतीबद्दल माझ्यासारख्याला शंका वाटते. शरद पवार यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा ३०-३५ वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून आजतागायत आहे. केंद्र सरकार ज्यावेळी झेड प्लस सुरक्षा त्या- त्या राज्याच्या सुरक्षा वगळता अधिक देते त्यावेळी ती व्यक्ती देशातील एक महनीय व्यक्ती आहे , म्हणजेच पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांना जी सुरक्षा दिली जाते तशी गांधी परिवारालाही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गृह मंत्रालयाकडे काही इनपुट असतील म्हणून ती दिली असावी. संजय राऊत आणि रोहित पवार यांना वाटते तसे पवारसाहेबांना वाटत नाही ते राज्याचे नाही तर देशाचे नेते असलेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, देशपातळीवर ते वेगवेगळ्या राज्यात जातात अशावेळी ही सुरक्षा दिली आहे. राज्याची झेड प्लस ही राज्यात राहते त्यामुळे केंद्र सरकारची सुरक्षा महत्वाची असते. शेवटी स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा शरद पवार यांचा अधिकार आहे. पण टिका टिप्पणी करत असताना वैचारिक दिवाळखोरी दाखवली जाते हे योग्य नाही. काँग्रेसचे सरकार असताना ठाकरे कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली होती, मग त्यावेळी काँग्रेसने पाळत ठेवण्यासाठी ती सुरक्षा दिली होती असे काँग्रेसवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही असा टोलाही लगावला.

लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीला हवी की नको याचे उत्तर द्यावे…

लाडकी बहिण योजनेवरून सुनिल तटकरे म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी उभ्या महाराष्ट्रातील तमाम महिला – भगिनींनी यासह इतर योजनांचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. या योजनेबद्दल महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी ही योजना अव्याहतपणे सुरू राहणार आहे असे सांगितले. मात्र विरोधकांनी या योजनेला पहिल्या दिवसापासून विरोध केला आहे. ही योजना त्यांना हवी की नको याचे उत्तर द्यावे असा उपरोधिक सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला.

‘ती’ पदयात्रा का काढली होती याचे विवेचन महाराष्ट्राला एकदा अकाली प्रौढत्व आलेल्या नेत्यांनी द्यावे…

रोहीत पवार यांच्या यात्रेवर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, त्यांनी काढलेल्या यात्रांमध्ये कशाची उधळपट्टी होती. राहुल गांधी यांच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व असा प्रतिसाद जगाच्या पाठीवर त्यांना मिळाला. ती पदयात्रा का काढली होती याचे विवेचन महाराष्ट्राला एकदा अकाली प्रौढत्व आलेल्या नेत्यांनी द्यावं आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे त्याची राजकीय धडकी भरलेल्या नेत्यांकडून याच्यापेक्षा वेगळया वक्तव्याची अपेक्षा काय करणार असा उपरोधिक टोलाही रोहित पवार यांना लगावला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *