Breaking News

सुप्रिया सुळे यांची टीका, हे सरकार घर फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीत व्यस्त कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश

हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला.

पुण्यातील सारसबागे समोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रियाताई सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचे आणखी एक अपयश समोर आले आहे. कारण फॉक्सकॉन प्रकल्पही पुण्यात येणार होता मात्र तो आला नाही. अनेक उद्योग आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत. हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवारांच्या दूरदृष्टीतून सुरू झाले. त्यात फेज-१, फेज -२, फेज-३ असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले. यासाठी देशातून लोक आले गुंतवणूक केली. मात्र आज तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वजण पाहात आहेत असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आयटी पार्कच्या पायाभूत सुविधा, पाण्याचा प्रश्न यासाठी मी स्वतः अनेकदा तिथे बैठका घेतल्या आहेत. अनेक पालकमंत्र्यांकडे चर्चा केली आहे, औद्योगिक सचिव, एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासोबत बैठका केल्या आहेत. तिथले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र राज्यातील सरकारकडे उद्योगांबद्दल गांभीर्य नाही. हे सरकार फक्त घरं फोडा , इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात इतकी व्यस्त आहे की त्यांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराकडे त्यांना पाहायला वेळ नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे आपण आदर्शमाता म्हणून बघतो. अगदी लहान वयात त्यांच्यावर एक प्रसंग घडला पण त्या खचल्या नाहीत. एक आदर्श जीवन त्या जगल्या आणि लढल्या, हार त्यांनी मानली नाही. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर या आमच्या आदर्श माता आहेत. देशातील कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, आज जयंतीनिमित्त आम्ही त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी येथे आल्याचे सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,… लढाई अजून संपलेली नाही काँग्रेसच्या ५ न्याय व २५ गॅरंटी घरोघरी पोहचवण्यात सेल व विभागाचे मोठे योगदान

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *