सुप्रिया सुळे यांचा सवाल, देशमुख, राऊतांना ईडी, मग कराडला का नाही? बारामतीत शेतकऱ्यांना धमक्या, हे गंभीर

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांना धमक्या किंवा त्यांचे फसवणूक झाली असेल तर गंभीर आहे. मी तर त्या शेतकऱ्यांशी स्वतः बोलणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांनाच भेटणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड आणि परभणीमध्ये जे काही झालं आहे, त्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे. गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनाच या संबंधी प्रश्न विचारले जातील. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे होता. अनेक नेत्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन नेत्यांवर ऐकिव माहितीवर आरोप झाले आणि त्यांनी राजीनामे दिले. बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं पाहिजे. त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले जातील. परळी आणि बीडमध्ये मंगळवारी गुंडांना सोडण्यासाठी टायर जाळण्यात आले, लोक टॉवरवर चढले, दुकाने बंद करण्यात आली. हे महाराष्ट्रात काय चाललंय, गृहमंत्री काय करत आहेत, असा सवालही यावेळी केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटला जाणारा वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला. त्यानंतर परळीमध्ये बाजारपेठ बंद करण्यात आली. कराड समर्थक टॉवरवर चढले. त्याची पत्नी आणि आई यांनी मकोका मागे घेण्यासाठी आंदोलन सुरु केले. परळीमध्ये जाळपोळ करण्यात आली. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप असताना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृह मंत्रालयाचे अपयश असल्याची टीकाही केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वाल्मिक कराड यांच्या संपत्ती संदर्भात रोज विविध माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे किती बँक खाती सील केली आणि त्यात किती पैसे होते याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. यापूर्वी ऐकिव माहितीवर अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांवर ईडी लावली. मात्र वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाही? असा सवालही यावेळी केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, उशिरा का होईना वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका लावला गेला त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो. पण पुढे काय? आम्हाला न्याय अपेक्षित आहे, कारण एका मुलाचा खून झाला आहे. खंडणी वसुली होत असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूकदार दहावेळा विचार करतील गुंतवणुकीच्या आधी. बीड आणि परळीमध्ये पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर किती बरं झालं असतं. संतोष देशमुख यांची मुलगी दहावीत आहे, तिचं खेळण्याचं वय आहे पण दिवंगत वडिलांसाठी न्याय मागते आहे. हा आपला महाराष्ट्र आहे का? असा सवाल करत वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी बीडची ही घटना आहे. जे कुणीही यामध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशीही मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि संबंधित घटनेमध्ये पारदर्शकपणे न्याय मिळावा यासाठी सरकारमधील मंत्री पूर्ण प्रयत्न करतील असं बोलतील, अशी माझी अपेक्षा होती अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळी विधाने समोर येतायत, त्यामुळे सरकारची त्या संदर्भात काय भूमिका आहे हे कळत नाही. या योजने संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे पत्र मी सरकारला लिहिलेल्याचंही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *