Marathi e-Batmya

जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ?

लक्झरी बसेस, एसटीच्या बसगाड्या खाना खजाना, आणखीवर बक्षिसी रक्कम, दिवसभर सगळ्या टीव्ही चँनेल्स अन्य समाजमाध्यातून जाहिराती आणि अन्य वृत्तपत्राच्या माध्यमांतून नंबर १ च्या मोठ्ठ्या जाहिराती देऊन मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला. तर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांना बोलवून काय साध्य केले अशी विचारणा शिवसैनिकांसह काँग्रेसनेही केली. तर समाजमाध्यमातून शिंदे गटावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय.

काल शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणी तरी लिहून दिलेले भाषण वाचले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून दाखविल्याचा आरोप केला. कारण संदर्भ लावताना शिंदे अनेकदा अडखळत होते. शिंदे यांच्या भाषणात सूर नव्हता आणि नूरही नव्हता, अशी टीका सर्वचस्तरातून करण्यात येत आहे. तर मराठवाडा विदर्भ तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या शिवसैनिकांनी आपली खरी निष्ठा ही उद्धव ठाकरे यांच्याशी म्हणजेच शिवसेनेशी असल्याचे दिसून आले.

पुण्यातल्या शिवसैनिकांनी सारे खोक्के पडले फिक्के म्हणत मैदान उद्धव ठाकरेंनी जिंकले असे म्हटले. जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांना शिंदे गटाने सभा मंचावर बोलवून काय साध्य केले ? असाही सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीने केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत ही कामं आमच्या सरकारची कामे म्हणून वाचून दाखविली, आपली फुटीरता कशी योग्य असल्याचे सांगत शिंदे यांनी मोदी – शहांचे अधिक गोडवे गायले. एकनाथ शिंदे त्यांचे भाषण सुरू असताना अर्ध्या लोकांनी मैदान खाली केले. त्यामुळे शिंदे गटाने कोट्यावधी रूपये खर्च करून भाडोत्री माणसे आणली, अनेक कामगार युपी बिहारचे असल्याची माहितीही पुढे आली. त्याच गर्दीने त्यांना धोका दिल्याची सर्वत्र चर्चा सुरू होती. अशी टीका शिंदे गटावर होत आहे.

आपल्या मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर गर्दी जमवण्यात शिंदे गटाने गावागावातून लोकांची जमवाजमव केली. आमच्या मेळाव्यासाठी आलात तर लक्झरी बस जेवण शिवाय आणखी वर बक्षिसही दिले जातेय अशी माहितीही पुढे आली. त्यामुळे शिंदे गटावर टीका करणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली. शिंदे गटाच्य़ा बीकेसी येथील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सव्वा तासाचे भाषण प्रत्येक ओळना ओळ वाचून दाखवले. आपल्या भाषणात आमच्या विरोधात बोलल्यावर काय होते ते माहित आहे ना, असे त्यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांचे नाव न घेता विरोधकांना जवळ जवळ धमकीच दिली.

तसेच उपस्थित लोकामध्येही जोश दिसत नव्हता. टाळ्याही पडत नव्हत्या. भाषण लांबत गेले. भाषणात महाराष्टाला कसा पुढे घेऊन जाणार महागाई, बेरोजगारी असे कोणतेही विषय नव्हते भाषणातल्या रटाळपणामुळे अगोदरच कंटाळलेल्या लोकांनी काढता पाय घेतला.

Exit mobile version