Breaking News

विरोधकांचा आक्षेपः मात्र मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा, देशद्रोह्यांविरोधात बोलणे गुन्हा असेल तर…. हक्कभंग प्रस्तावावर निर्णय नसताना मुख्यमंत्र्यांना खुलासा करण्याची दिली संधी

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारवर महाराष्ट्र द्रोही अशी टीका केली. तर त्यास प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उद्देशून देशद्रोह्याच्या साथीदारांबरोबर चहा पिण्याची वेळ आली नाही असा पलटवार केला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याप्रकरणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांनी हक्कभंग प्रस्ताव आणला. त्याबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे कोणताही निर्णय न घेता मुख्यमंत्र्यांना खुलासा करण्याची संधी दिल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. मात्र आज विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांना खुलासा करण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशद्रोह्यांच्या विरोधात बोलणे गुन्हा असेल तर तो मी ५० करीन असे सांगत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे विरोधकांनी हक्कभंगाची सूचना दिल्यानंतर आता हा हक्कभंग स्वीकारला जाणार का, या चर्चेलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात खुलासा करीत पूर्णविराम दिला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे किंवा विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही बोललेलो नाही. तर दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत संबंध ठेवण्याऱ्या नवाब मलिक यांना देशद्रोही संबोधलो, असा खुलासा करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी देशद्रोह्यांविरोधात बोलणे गुन्हा असेल तर तो मी ५० वेळा करीन, मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे, अशा शब्दांत विरोधकांच्या प्रस्तावातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली. त्यावेळी विरोधकांकडून हक्कभंगावर खुलासा हा समितीकडे होऊ शकतो सभागृहात नाही, असा आक्षेप नोंदवला. यावर उपसभापतींनी हा आपला अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना बोलण्याची परवानगी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. त्यानंतर शिंदे यांनी आपले म्हणणे मांडले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, माझे वक्तव्य अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्याविरोधातील नव्हते, तर माझे देशद्रोह्याबद्दलचे वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल होते. मलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे कुख्यात गुंड व देशद्रोही दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इकबाल मिर्ची, हसीना पारकर यांच्यांशी संबंध होते. दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत त्यांनी जमीन आणि गाळे खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हसीनाचा ड्रायव्हर सरदार खान ज्याला बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाली होती. त्याच्याकडूनही मलिक यांनी जमीन घेतली. यामुळेच त्यांना अटक झाली असून जामीन देखील झालेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आम्ही काय महाराष्ट्रद्रोह केला, असा सवाल शिंदे यांनी विरोधकांना केला. मलिक देशद्रोही असतानाही त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण संजय राठोड यांचा राजीनामा घेतला म्हणून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अशा मागच्या सरकारमधील मंत्रिमंडळासोबत आम्ही चहा घेणार नाही असे म्हणालो. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. दाऊदसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्याला मी देशद्रोही बोललो, देशद्रोह्यांविरोधात बोलणे गुन्हा असेल तर तो मी ५० वेळा करीन, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. त्यांच्याविषयीचा हक्कभंग मी स्वीकारलेला नाही. त्यामुळे तो हक्कभंग समितीसमोर पाठवायचा की नाही त्यावर मी निर्णय घेईन, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

मलिकांविरोधातील आरोप सिद्ध नाहीत – विरोधक
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, मलिकांसोबत स्वत: मुख्यमंत्री मंत्रिमंडळात होते, ही बाब विरोधकांनी निदर्शनास आणली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत