Breaking News

अमित शाह यांचा लालबाग आणि वांद्रे गणपती दर्शन दौरा सरकारी का खाजगी? लालबाग राजाच्या दर्शन आणि आशिष शेलार यांच्या मंडळाच्या गणरायाच्या दर्शनाची माहिती व जनसंपर्क विभागाकडून बातमी

देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर आले. मात्र शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे खाजगी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय नेते किंवा राज्यातील मंत्र्याच्या दौऱ्याचे कोणतेही वृत्त अर्थात बातमी शासकिय विभागाकडून जारी करायचे नाही असे संकेत आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांचे भाजपाच्या पाठिब्यांवर असलेले सरकार अस्तित्वात आहे. मात्र या शासकिय संकेताला धक्का लावत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाकडून याबाबतचे अधिकृत बातमीच सर्व माध्यमांना पाठविली. त्यामुळे माहिती व जनसंपर्क विभाग खाजगी दौऱ्याच्या बातम्या कधीपासून करायला लागला अशी विचारणा मंत्रालयातूनच व्यक्त करण्यात येत आहे.

शासकिय संकेतानुसार खाजगी दौऱ्यावर असलेल्या कोणत्याही मंत्र्याची बातमी माहिती व जनसंपर्क विभागाने द्यायची नाही असा दंडक अर्थात संकेत आहे. त्यानुसार आतापर्यंत हे संकेतही माहिती व जनसंपर्क विभागाने पाळला आहे. मात्र अमित शाह यांच्यासाठी हा संकेत का मोडण्यात आला याबाबत चर्चाही मंत्रालयात सुरु आहे.

विशेष म्हणजे अमित शाह यांच्या या नियोजित खाजगी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी होणार नव्हते. तसे मुख्यमंत्री सचिवालयाकडूनही सकाळी सांगण्यात आले. मात्र अचानक अमित शाह यांच्या दौऱ्यात ते ही सहभागी झाल्याचे दिसून आले.

केवळ राजकिय पक्ष बघून खाजगी दौऱ्याच्या बातम्या ही माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात येतात की काय असा सवालही या निमित्ताने उपस्थित करण्यात येवू लागला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लालबागच्या राजा मंडळाला भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टच्यावतीने शहा यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर अमित शहा यांनी लालबागच्या राजा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमित शहा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी आज आपल्या मुंबई दौऱ्याची सुरुवात लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन केली. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सोनल शहा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड.आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.
त्यानंतर अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. दरवर्षी विविध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या या मंडळातर्फे यावर्षी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फुट उंच प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्याचे अमित शाह यांनी कौतुक केले.

वांद्रे भेटीनंतर अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब ‘गणेश दर्शन’ घेतले. पुढे अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तेथे त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शिंदे यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला.

राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिध्द केलेली बातमी खालीलप्रमाणे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सोनल शहा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड.आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्यावतीने केंद्रीय मंत्री श्री. शहा यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.
मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे यंदाचे ८९ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री.राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *