Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारचा भूखंडावर ताव, लाडक्या मंत्र्यांसाठी योजना बिल्डरमंत्री संजय राठोड लाभार्थी

महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रिमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल विभागातील हा मोक्याचा भूखंड खाणारा बिल्डरमंत्री सरकारचा लाडका आहे. कागद पत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेराफेरी सरकारने सुरू केला असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाईची मागणीही यावेळी करत महायुती सरकारवर आज हल्लाबोल केला.

आपल्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी सरकार मधील भ्रष्टाचाराच्या कागपत्रांची हेराफेरी समोर आणली.

यावर संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गोर बंजारा समाजासाठी नवी मुंबईतील बेलापूर येथे दीड एकर भूखंड मिळाला होता. हा पाचशे कोटींचा भूखंड स्वत:च्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम मंत्री संजय राठोड यांनी केला असून गोर बंजारा समाजाची फसवणूक केली. मंत्री राठोड यांना भूखंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकारकक्षेबाहेर जावून मदत केली. मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कारवाई करून हा भूखंड दिला आहे. यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला. गोरबंजारा समाजाची यामध्ये फसवणूक झाली आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर मंत्री राठोड भूखंड परत करण्याची भाषा बोलत आहेत. परंतु आता वेळ निघून गेली असून त्यांचा इरादा समाजाच्या लक्षात आला आहे. राठोड यांनी मंत्री म्हणून देखील बेकायदेशीर काम केले आहे. २२०० कोटी रुपयांचे बजेट असताना ८००० कोटींची टेंडर काढल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमधील बिल्डर मंत्र्याने तर कहरच केला. जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशन या खासगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली ७०० कोटींचा कुलाबा महसूल विभागातील भूखंड हडप केला. याची सगळी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे अजून शासन निर्णय निर्गमित केला नाही. सरकारने अशी चलाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आल्याचा आरोपही यावेळी केला.

नागपूर येथील हिट अँन्ड रन प्रकरणाची सरकारने चौकशी करून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार करत पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात अजित पवार गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता तर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आरोपींना पाठिशी घालत आहेत. नंबर प्लेट काढून, सीसीटीव्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी केला.

Check Also

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *