Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का मंत्री अनिल पाटील यांच्या उत्तरावर विजय वडेट्टीवार सह विरोधकांचा आक्षेप

राज्यात दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि तो कालावधी किती असेल, प्रतिहेक्टरी किती दर असेल असा सवाल करत पहिल्याच प्रश्नांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला आज विधानसभेत पावसाळी अधिवेशात केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात अवकाळी,गारपीठ, दुष्काळात शासन निर्णयाप्रमाणे फक्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळाली नाही. चारा टंचाई, पाणी टंचाईने मराठवाडा होरपळून गेला आहे. सोयाबीनला २०१३ चे दर यावर्षी मिळाले. खतांचे, बियाणांचे दर वाढले आहेत यामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. ८८ हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झाले आहे. अमरावतीत ५४ हजार हेक्टर, अकोला ११ हजार १५७ हेक्टर, यवतमाळ २ हजार ४९४ हेक्टर, बुलढाण्यात ५ हजार ५७७ हेक्टर, वाशीममध्ये ३ हजार ८८८ हेक्टर, खानदेशात नऊ हजार हेक्टर, मराठवाड्यात दोन हजार सातशे सोळा हेक्टर चे प्रस्ताव आले आहेत. या शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करावी ही मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांना किती दिवसात नुकसान भरपाई देणार, तो कालावधी किती असेल आणि प्रतिहेक्टरी किती मदत देणार असा सवाल करत सरकारला धारेवर धरले.

राज्यात या वर्षात जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टर शेतीतील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची मदत शासन एन.डी.व्ही.आय (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार १५ जुलै २०२४ पर्यंत करणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तासात दिली.

अवकाळी पाऊस नुकसानाबाबत सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, नुकसानाबाबत मदतीचा ४९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त झाला आहे. याबाबत ५ फेब्रुवारी २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रस्ताव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून एन.डी.व्ही.आय चे निकष तपासून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यानंतर मागणीनुसार १५ जुलै २०२४ पर्यंत मदत करण्यात येईल. तसेच फळबागांच्या नुकसानाबाबतही मदत देण्यात येईल, असेही सांगितले.

राज्यात यावर्षी जानेवारी ते मे महिन्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे २,९१,४३३ हेक्टर जमिनींवरील पिकांचं नुकसान झालं असून राज्य सरकारने यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वितरण येत्या १५ जुलै पर्यंत करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला.

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *