Marathi e-Batmya

स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे २,५३,१६२ नागरिकांचा सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

स्वच्छ भारत दिवस २०२३ च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक शेखर रौंदळ, अवर सचिव चंद्रकांत मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यातील २४,३४० गावे म्हणजेच ६० टक्क्यांपेक्षा अधिक गावे हागणदारी मुक्त (ODF Plus) जाहीर झाली आहेत. ही बाब राज्यातील नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक आहे, या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी उत्तम नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्य:स्थितीत १०,१८८ उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे ४३,८५,४४१ नागरिकांनी सहभाग नोंदवला.

दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या स्वच्छता संवाद कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंचांनी त्याचा जिल्हा, तालुका, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आपले अनुभव सांगितले. त्यांनी केलेल्या उपाययोजना राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. या कार्यक्रमात प्रशासनाबरोबर नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत आहे. ही बाब महाराष्ट्र शासनासाठी उत्साहवर्धक आहे. आपण सर्व जण एकत्र येवून राज्याला स्वच्छ राज्य म्हणून मार्च २०२४ पर्यंत घोषित करण्याबाबत प्रयत्न करु या, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

Exit mobile version