Marathi e-Batmya

इज्तेमासाठी तगडा पोलीस बंदोबस्त

औरंगाबाद : प्रतिनिधी
लिंबे जळगाव भागात होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमासाठी देशभरातून लाखो भाविक येणार असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. औरंगाबाद आयुक्तालयाचे ३ तर बाहेरून २ हजार असे तब्बल ५ हजार अधिकारी आणि कर्मचारी या बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. इस्तमाचे ठिकाण, पार्कीग आणि रस्त्यावर अशा तीन ठिकाणी हा बंदोबस्त विभागण्यात आला आहे. वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी या भागातून जाणारी नियमितची वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविण्यात आली आहे. हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सर्व काळजी घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.
लिंबेजळगाव येथे २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय इज्तेमा होत आहे. तब्बल ८० लाख स्केअर फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे. देशभरातून तब्बल १५ लाख भाविक येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने पोलीस विभागही भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज झाला आहे.
औरंगाबाद आयुक्तालयाचे ३ उपायुक्त, ८ सहाय्यक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, १०० सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, २००० सहाय्यक उपनिरीक्षक, पोलीस शिपाई आणि ३ बाँम्बशोधक पथक यांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातून ७ उपायुक्त, १५ सहाय्यक पोलीस आयुक्त, ३३ पोलीस निरीक्षक, १०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, १७०० सहाय्यक उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, ३ एसआरपीएफच्या कंपन्या आणि ६ बॉम्बशोधक पथक मागविले आहे. अशा पद्धतीने एकूण बंदोबस्तामध्ये १० उपायुक्त, २३ सहाय्यक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, २०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ३७०० सहाय्यक उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई, ३ एसआरपीएफच्या कंपन्या आणि ९ बॉम्ब शोधक पथक यांचा समावेश राहणार आहे. हा बंदोबस्त कार्यक्रम स्थळ, पार्कींग, घातपाथ विरोधी पथक, रस्त्यावरील वाहतूक, शहरातील वाहतूक अशा ९ परिशिष्टात विभागण्यात आला आहे.
इस्तमाच्या ठिकाणी ३ उपायुक्त, ३ सहाय्यक पोलीस आयुक्त, १४ पोलीस निरीक्षक, ४० सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ७७० पोलीस शिपाई बंदोबस्तासाठी राहणार आहेत.
इस्तमासाठी राज्यभरातून लोक येणार असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी संख्या जमणार आहे. या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात येणारी आणि औरंगाबादहून मुंबई, पुणेकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. विविध मार्गाने इस्तमाच्या ठिकाणी येणारी वाहने त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहचविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यांना त्यांचे कोड देण्यात आले आहेत. त्या जिल्ह्याच्या कोडची गाडी त्याच पार्कीगमध्ये लावू देण्यात येणार आहे. दुसऱ्या गाडीला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. ही सर्व व्यवस्था पाहण्यासाठी २ उपायुक्त, ४ सहाय्यक आयुक्त, ६ पोलीस निरीक्षक, १३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ४०० शिपाई तैनात करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बाहेरून तब्बल ३०० तज्ज्ञ अधिकारी बोलाविण्यात आले आहेत.

पोलिसांच्या मदतीला ६ हजार स्वयंसेवक
इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी आयोजन समितीच्या वतीने तब्बल ६ हजार स्वयंसेवक तैनात आहेत. हे स्वयंसेवक इस्तीमाचे ठिकाण, पार्कींगचे ठिकाण राहणार आहेत. तसेच इस्तीमासाठी येणाऱ्या विविध रस्त्यांवर उभे राहून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करणार आहेत. स्वयंसेवकांची मदत पोलिसांना महत्वाची ठरू लागली आहे.

Exit mobile version