Marathi e-Batmya

दलितांच्या विरोधात मेसेजस करणाऱ्यांवर कारवाई कधी?

मुंबईः प्रतिनिधी

१ जानेवारी दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर कोरेगाव भिमा आणि सणसवाडी, शिक्रापूर येथील समाजकंटकांनी दगडफेक, वाहनांची जाळपोळीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदच्या कालावधीत काही ठिकाणी हिसंक कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर दलितांच्या विरोधात प्रक्षोभक मेसेजेस करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई कधी करणार असा सवाल दलित संघटनांकडून करण्यात येत आहे.

कोरेगाव भिमा येथील हिंसक घटनेनंतर लगेचच दलित समाजाला उद्देशून अनेक उच्चवर्णिय समाजातील तरूणांनी सोशल नेटवर्किंग साईटवरील अधिकृत आणि बनावट खात्यावरून प्रक्षोभक मेसेजेस केले. त्यामुळे दलित समाजात मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होण्यास हातभार लागला. तरीही महाराष्ट्र बंदच्या कालावधीत हिंसक कृत्य करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानुसार पोलिसांनीही दलित समाजातील युवकांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

मात्र मुख्यमंत्र्यांकडून दलित समाजाच्या विरोधात मेसेजेस व्हायरल करणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही कारवाई करण्याचे अद्याप जाहीर वक्तव्य केलेले नाही. त्याचबरोबर कोरेगाव भिमा येथील गेलेल्या दलित समाजातील व्यक्तींच्या अनेक चारचाकी आणि खाजगी बसेसवर दगडफेक करत काही गाड्या जाळल्या त्याची नुकसान भरपाई देण्याबाबत किंवा ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले, त्यांच्याकडून वसूल करण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

त्यामुळे मुख्यमंत्र्याची भूमिका दूजाभाव करणारी असल्याची भावना दलित समाजात निर्माण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रमाणे हिंसक कृत्य केले म्हणून दलित युवकांवर कारवाई करण्याची घोषणा केली, तशी कारवाई कोरेगाव भिमा येथील समाजकंटकावर कारवाई करण्याची घोषणा करावी अशी मागणीही दलित समाजातील नागरीकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version