Marathi e-Batmya

तेजोमय संत विचारांची संगीतमय नाट्यानुभूती

मुंबई: संजय घावरे

भारत ही संतांची भूमी आहे. या मातीत जन्मलेल्या प्रत्येक संताने समाजातील दुर्बल घटकांसाठी वैचारीक, सामाजिक तसंच पारमार्थिक लढा उभारला. बहुजन समाजात जन्मलेल्या बहुतेक संतांनी मनामनात नवविचारांची ज्योत प्रज्वलित करीत नवी क्रांती घडवण्याचा प्रयन्त केला. परंतु तत्कालीन उच्चवर्णीय धर्ममांर्तंडानी त्यांना विरोध करीत नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर त्यांच्याबद्दल अपप्रचार करीत जनमानसापर्यंत चुकीचा संदेश पोहोचवला. चर्मकार समाजातील बांधवांच्या मनात मानवता आणि समतेचं बीज पेरत जाती भेदाला मूठमाती देणाऱ्या संत रविदासांच्याबाबतीतही असंच घडलं. मूळ काशीजवळ जन्मलेल्या संत रविदास अर्थात रैदासांना कुणी रवीदास म्हणतं, तर कुणी रोहिदास… याच संत रैदासांनी जातीभेदाविरोधात पुकारलेल्या लढ्याची गाथा ‘सत् भाषै रैदास’ या हिंदी नाटकात पाहायला मिळते.

प्रायोगिक रंगभूमी ही खऱ्या अर्थाने उदयोन्मुख कलाकार-तंत्रज्ञ घडवणारं व्यासपीठ आहे. या रंगभूमीवर ज्वलंत विचारांची बरीच नाटकं येतात, पण विविध कारणांमुळे ती रसिकांपर्यंत पोहोचत नाहीत ही खंत आहे. ‘सत् भाषै रैदास’हे याच प्रायोगिक रंगभूमीवर संत रैदासांचे विचार आणि संघर्ष संगीताद्वारे मांडणारं छोटेखानी नाटक आहे. संत रैदासांच्या जीवनावर आधारित असूनही हे नाटक कुठेही त्यांचा जीवनप्रवास सादर करीत नाही. याउलट मानवता, समता, बंधूभाव, जातीभेद याबाबतच्या त्यांच्या विचारसागराचं दर्शन घडवतं. हाच या नाटकाचा सर्वात मोठा प्लस पॅाइंट आहे. शीर्षकाप्रमाणे हे नाटक रैदासांचे सत्य विचार मांडतं. एखाद्या कथानकाच्या माध्यमातून संत रैदासांचे विचार मांडण्याऐवजी त्यांच्या जीवनातील काही घटना, त्यांनी रचलेले दोहे, नृत्य, गायन, संगीत आणि अभिनयाद्वारे त्यांची वचनं आजही कशी सत्य आहेत ते पटवून देण्याचं काम या नाटकात करण्यात आलं आहे.

तेराव्या-चौदाव्या शतकातील रैदास आणि आजच्या शतकातील दाभोलकर-पानसरे यांच्या संघर्षाची सांगडही या नाट्यात घालण्यात आली आहे. लखनऊमधील लेखक राजेश कुमार यांनी या नाटकात रैदासांना त्या काळातील उच्चवर्णीय धर्ममार्तंडांनी केलेला विरोध, रैदास चमत्कार करून बहुजन समाजाला नादी लावत असल्याचा केलेला आरोप, त्या काळात धर्मांतरण करूनही मिळणारी हीन वागणूक, संत मीराबाईंनी संत रैदासांचं स्वीकारलेले शिष्यत्व, काशी नरेशच्या महालात संत रैदासांनी दिलेली कृष्णदर्शनाची प्रचिती आणि चर्मकार समाजात जन्माला येऊनही अखेरीस रैदास ब्राम्हण असल्याचा सवर्णांनी केलेला अपप्रचार असा संत रैदासांच्या स्तुत्य विचारांचा आलेख या नाटकात मांडला आहे. दिग्दर्शिका रसिका आगाशे यांनी अतिशय सुरेखरीत्या हे विचार रंगमंचावर सादर करण्याचं काम केलं आहे. अभिनयाला नृत्याची जोड देताना नाटक आपल्या मूळ हेतूपासून ढळणार नाही याची विशेष काळजी रसिका यांनी घेतली आहे. त्यांना संगीतकार आमोद भट यांची सुरेख साथ लाभली आहे.

धम्मरक्षीत रणदिवे हा तरुण अभिनेता संत रैदासांची व्यक्तिरेखा साकारताना अभिनयासोबतच पट्टीचा गायक असल्याची जाणीव करून देतो. संत रैदासांचे दोहे मुखोद्गत असणाऱ्या धम्मरक्षीतने एका दोह्यादरम्यान आळवलेला दीर्घ सूर त्याची तुलना एखाद्या व्यावसायिक गायकाशी करण्यासाठी पुरेसा ठरतो. हे नाटक संगीतमय असल्याने सर्वच कलाकारांचा अभिनयासोबतच गायनाचाही कस लावणारं आहे. विशेष म्हणजे आजवर कुठेही प्रकाशझोतात न आलेल्या या नाटकातील सर्वच कलाकारांनी सहजसुंदर अभिनयाचं दर्शन घडवत रैदासांचे विचार पोहोचवण्याचं काम केलं आहे. बीइंग असोसिएशनची प्रस्तुती आणि अनामिका प्रकाशित असलेल्या नाटकात मीना सिंग, मुस्कान गोस्वामी, मोहित भाटीया, अनामिका तिवारी, कौशिक कुलकर्णी, सिद्धार्थ बावीस्कर, सौरभ ठाकरे, विपुल नगर, गौरांग खैराती, सत्यम अग्रवाल, राजाराम या सर्वच कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला आहे. विपुल नगर यांनी मटकाराम, रघुराम या व्यक्तिरेखांमध्ये अगदी अचूकपणे रंग भरले आहेत. कलाकारांच्या जोडीला विक्रांत ठाकूर यांच्या प्रकाश योजनेचंही कौतुक करावं लागेल. मीना यांनी कॅास्च्युम डिझाइन केलं असून, मंदार जाधव यांनी टाळाची साथ केली आहे.

विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आजच्या ध्येयवादी समाजाला संत विचारांच्या टॅानिकची खरी आवश्यकता आहे. ‘सत् भाषै रैदास’हे नाटक त्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल असल्याचं म्हटलं तर अशा प्रकारच्या नाटकांची निर्मिती होणं ही काळाची गरज असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. व्यावसायिक नाटकांना पसंती दर्शवणाऱ्या नाट्यप्रेमींची अशा प्रकारच्या प्रायोगिक नाटकांसाठीही गर्दी करणे आता काळाजी गरज आहे.

Exit mobile version