Marathi e-Batmya

सिंधू नदीवर ह्युम पाइप पुलाचे बांधकाम, दळणवळण सुलभ

लेह-लडाख ‘एलओसी’वर लडाखमधील नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्युम पाइप पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. शिवाय लष्कर आणि सामान्य नागरिकांना न्योमा आणि निडर या गावांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. तसेच दिवसेंदिवस चीनच्या कुरापतीमुळे भारत सरकारने या भागात आक्रमक, वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. भारतीय लष्करामधील स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या न्योमा सॅपर्सने पूर्व भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने मंगळवारी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबतची माहिती दिली.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पूर्व लडाखमधील न्योमा आणि निडर परिसरातील गावांदरम्यान नागरिक आणि लष्कराची ये जा सोपी व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाची पूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. एकूण १ मिनिट ७ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पूल बनवण्याच्या पूर्ण प्रकियेबरोबर लष्कराची काही अवजड वाहने देखील या पुलावरून जाताना दिसत आहेत.

या माध्यमातून हा पुल किती भक्कम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न लष्कराने केला आहे. हे पूल बांधण्यासाठी लष्कराच्या इंजिनियर्सनी ह्यूम पाइपचा वापर केला आहे. त्यानंतर त्यावर मजबूत बांधकाम केलं आहे. तसेच या पुलाचे काम कमीत कमी वेळात झाल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वी ३० जुलै रोजी लडाखमधील भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने ४०० मीटर लांब पुलाचे बांधकाम केल्याची माहिती पुढे आली होती. मात्र हा पुल चीनने १९५८ मध्ये बळकावलेल्या भागात बांधण्यात आला होता.

Exit mobile version