Breaking News

संघर्षातून द्राक्षशेती फुलविणारी कृषिकन्या – उमा क्षीरसागर वयाच्या १९ व्या वर्षी ६ एकराचे रान द्राक्षाने शेतीने फुलविले

मराठवाडा म्हटलं की पहिलं चित्र डोळ्यासमोर उभा राहतं ते म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळी परिस्थितीने नाडलेली इथंली माणसं, परंतु अशा दुष्काळी परिस्थितीत देखील या भागात अशी काही माणसं आहेत जी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर येथील नैसर्गिक परिस्थितीला आव्हान देऊन या भागाची ओळख बदलू पाहत आहेत. खरं तर अशा लोकांकडे पाहून इतरांना देखील जगण्याची आणि काही तरी वेगळं करुन दाखविण्याची उर्जा  व प्रेरणा मिळत राहते. त्यापैकीच एक नाव म्हणजे उमा क्षीरसागर, उमाने आपल्या जिद्द व मेहनतीने मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात द्राक्षशेती फुलवून येथील तरुण युवक- युवती, महिलांपुढे एक उदाहरण घालून दिले आहे.

खरं तर द्राक्षशेतीचा नाद करणं हे काही येऱ्या- गबाळ्याचं काम नाही असं म्हटलं जातं. वास्तविक त्यात तथ्यही कारण द्राक्षशेती करण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द-चिकाटी सोबतच नैसर्गीक परिस्थितीशी दोन हात करण्याची देखील जबरदस्त तयारी ठेवावी लागते. त्यामुळे अनेक नवखे शेतकरी द्राक्षशेतीच्या नादाला लागण्यापुर्वी हजारवेळा विचार करत असतात. परंतु याला अपवाद राहिलीय ती १९ वर्षाची उमा क्षीरसागर ही तरुणी, पुरुष शेतकऱ्यांना देखील लाजवेल अशा पध्दतीने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीची तयारी ठेऊन तिने द्राक्षशेतीचा नाद केलाय, आणि तो नाद या ताराराणी काळजाच्या वाघिणीने यशस्वी करुन दाखवलाय. आज एक – दोन नव्हे तर तब्बल ६ एकर शेती उमा एकटी पिकवतेय.

आज द्राक्षशेतीकडे वळणाऱ्या युवती, महिलांसोबतच, पुरुष शेतकऱ्यांसाठी उमा रोलमॉडेल ठरली आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची गावात एका साधारण शेतकरी कुटुंबात उमाचा जन्म झाला आहे. सर्वसामान्य समाज मानसिकतेप्रमाणेच वंशाला दिवा मिळेल या अपक्षेने क्षीरसागर कुटुंबात जन्मलेल्या आठ मुलींपैकी सातव्या क्रमांकाची ही मुलगी, खरं तर वडिलांना घरी मुलाची अपेक्षा होती, मात्र ती काही पुर्ण होऊ शकली नाही.  परंतु क्षीरसागर कुटुंबात असणारी मुलाची ही उणीव उमाने भरुन काढली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज एखाद्या मुलाप्रमाणेच तीने आपल्या घराची व शेतीवाडीची जबाबदारी खांद्यावर पेलली आहे.

घरी आजारी वडील, आई आणि सात बहिणी असा परिवार, वडील नारायण क्षीरसागर यांनी ३० वर्ष दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केलं. प्रामाणिकपणाने व मेहनतीने काम करुन वडील नारायण यांनी गावात सहा एकर जमीन विकत घेतली. परंतु जमीन घेऊन झाली आणि काही काळातच नारायण क्षीरसागर यांचा अपघात झाला. गुडघे फ्रॅक्चर झाले. तेव्हा ६ एकरांपैकी एका एकरात द्राक्षबाग होती. वडिलांचा अपघात झालेला. आई वृद्धत्वाकडे झुकलेली. बहीण मतिमंद अशा परिस्थितीत शेतीकडे कोण पाहणार ?  शेती ओसाड होऊन पुन्हा गरिबीत जीवन कंठायची वेळ येणार या भितीने उमा चिंताग्रस्त झाली होती.

परंतु अशा कठीण परिस्थितीत हातपाय गळू न देता तीने आपल्या कुटुंबाचा आधार होण्यासाठी वयाच्या १३ व्या वर्षात उमाने कंबर कसली. ज्या वयात मुली लाली- पावडरचा डबा हाती घेऊन साजशृंगार करु लागतात, त्या वयात उमाने हाती औषध फवारणीचा गण घेऊन मोठी जबाबदारी सांभाळली.

लहानपणापासून शेती कशी करतात,  पिकं कशी घेतात,  द्राक्षबागेवर कोणती रासायनिक औषधं कशी फवारतात हे सगळं ती बारकाईनं बघत होतीच. सुरुवातीला ताकदीची कामे करताना तिला मोठा त्रास सहन करावा लागला, परंतु  आतापर्यंतचं निरीक्षण आणि वडिलांचं मार्गदर्शन यामुळे उमाचं मनोधैर्य वाढलं. कष्ट कामी आले आणि द्राक्षबाग बहरली. पहिल्या वर्षी तिला द्राक्षशेतीमधून दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं,त्यामुळे तिचाही आत्मविश्वास आता वाढला, वर्षाकाठचे दीड लाखाचेउत्पन्न तिने ४ लाखांवर नेले. ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने औषधांची फवारणी करताना ती करीत असलेला औषधांचा अचूक वापर आसपासच्या शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय असतो. तिने द्राक्षापुरते मर्यादीत न राहता इतर पिकांवर काकडी, कलींगड, खरबूज पिके घेतली. उमा सातत्याने नवनवे प्रयोग शेतीत करीत आहे.  ती याविषयी म्हणते, ‘मी ही शेती सांभाळून नेली पाहिजे अशी वडिलांची इच्छा होती. मग मी ही बाईपणाची झूल झुगारून सहा एकरांचा गाडा स्वतः ओढला. आईवडिलांचा सांभाळ करून वर्षाकाठी ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळवतेय याचे समाधान आहे. शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. शेतीला १ शेततळे, दोन विहिरीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो, द्राक्षशेतीसाठी संपुर्णपणे ड्रीपचा वापर केला आहे, त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याची बचत देखील होते.

आज ‘मुली देखील उत्तम शेती करू शकतात हे उमानं दाखवून दिले आहे. उमाने यंदा बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली असून सध्या ती जालन्यातील जेईएस कॉलेज मध्ये बीएससी अग्रीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. उमाला शेती क्षेत्रातच करिअर करायचे असून भविष्यात तिला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असे कार्य करायचे आहे.

माझं जे काही अस्तित्व आहे त्याची सुरुवात शेतीतूनच झाली आहे आणि याचा शेवटही शेतीतच होईल असं ती सांगते. दुष्काळाने खचून आत्महत्येचा मार्ग स्विकारण्यापेक्षा शेतकऱ्यांनी संघर्षाची तयारी ठेऊन मेहनत केल्यास आपण सर्व कठीण परिस्थितीवर मात करु शकतो असा ती शेतकऱ्यांना विश्वास देते आहे.

आपल्या मुलीबद्दल नारायणराव आज अभिमानानं बोलतात, “दोन-तीन वर्षांपासून शेतीचं सगळं काम उमा करते. एखाद्या पुरुषशेतकऱ्यासारखंच ती काम करते. औषध फवारणी असो, पिकाला पाणी देणं सगळंकाही ती करते. मला मुलाची गरज नाही, अशी मुलगी काम करुन राहिली आहे ”, असं नारायणराव कौतुकानं सांगत असतात.

उमाच्या  आईलाही आपल्या या लेकीचा सार्थ अभिमान आहे. ती उमाला आपला मुलगाच मानते. परंतु तिच्या बाईपणाची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे  आता उमाचं लग्न वय झाल्याने तिच्या लग्नाचीही त्यांना काळजी आहे. आता उमाला स्थळं येऊ लागली आहेत. त्यावर तिची आई सांगते, “उमा सगळी कामं करते. स्वयंपाक करते, झाडलोट करते, दुधं काढते. रात्री बाराला लाईट आली की मोटर चालू करुन पिकांना पाणी देते. तुमचा मुलगा काय करीन ते सगळं आमची मुलगीच करते.

आज या उमाचे आई-वडिल जरी उमाला वंशाचा दिवा मानून  मुलींन आमचं स्वप्न साकार केलं म्हणून सांगत असले तरी आज समाजात या उमासारख्याच अनेक उमा आहेत, की ज्या संघर्षाच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा आधार बनून जबाबदारी सांभाळत आहेत. परंतु लहान वयात मोठी जबाबदारी सांभाळत असताना या मुलींचे बालपण आणि स्वप्ने मात्र हरवतात. आज अशा मुलींची स्वप्ने पुर्ण कशी होतील, हे पाहण्याची जबाबदारी शासनाची व आपल्या समाजाची आहे. त्यामुळे समाजातील लोकांनी व शासनाने देखील अशा गुणी व मेहनती मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायला हवं. तरंच  महिला सक्षमीकरणाबरोबरच देशही समृध्द आणि प्रगतीच्या दिशेने झेप घेईल.

लेखक : अभिजीत झांबरे- ७७३८६७५३५३

Check Also

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर फडकवला, भारताचा राष्ट्रीय ध्वज चिकाटी आणि सहकार्य यातून हे ध्वजारोहन साध्य

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *