Marathi e-Batmya

हसीना शेख यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, बांग्लादेशातून पलायन

देशातील बेरोजारीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा भडका उडाल्याने आणि विद्यार्थ्यांनी ढाकाकडे लाँग मार्च काढल्याने आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अखेर बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी आज दुपारनंतर पंतप्रधानाचा राजीनामा देत थेट भारतात पलायन केल्याची माहिती वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

मागील काही दिवसांपासून बांग्लादेशमधील विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांकडून बेरोजगारीच्या प्रश्नांवरून सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत होती. त्यातच बांग्लादेशाच्या विविध भागात पोलिस प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या सामना होत असल्याचे दृष्य पाह्यला मिळत होते. इतकेच नव्हे तर हसीना शेख यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधई पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही हिंसक संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या. या संघर्षात जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

बांग्ला देश सरकारने सरकारच्या प्रस्तावित कोट्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेदभाव विरुद्ध विद्यार्थी या बॅनरखाली त्यांचा ‘लाँग मार्च टू ढाका’ काढला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची धग देशभर पसरू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून बांगलादेश सरकारने इंटरनेटवर पूर्णपणे बंदी घातली.

जुलैमध्ये विरोध सुरू झाल्यापासून तब्बल ३०० लोक मारले गेले, रविवारी झालेल्या भीषण संघर्षात किमान ९४ जणांचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान हसीना शेख यांचा राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर या उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाल्याने पंतप्रधान हसीना शेख यांनी आज राजीनामा दिला.

राजधानी ढाका आणि इतर विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांसह अनिश्चित काळासाठी रविवारी संध्याकाळी नवीन कर्फ्यू लागू झाल्याचे लष्कराने जाहीर केले. सरकारने यापूर्वी ढाका आणि इतरत्र काही अपवाद वगळता संचारबंदी लागू केली होती.

रविवारी सकाळी सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागल्याने नोकरीच्या कोटा पद्धतीवरून हसिना शेख यांच्या राजीनाम्याच्या एकसूत्री मागणीसह स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनच्या बॅनरखाली असहकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या छात्र लीग, आणि युवा लीग कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

विद्यार्थ्यांच्या या निदर्शनाचे मुख्य कारण म्हणजे, नोकरीच्या आरक्षण कोट्यात स्वातंत्र्य सैनिकांनाही स्वतंत्र कोटा देण्याचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होत आणि त्याची परिणती तेथील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात झाली. एकाबाजूला देशात हिंसक आंदोलने होत असताना बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारताकडे पलायन केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी श्रीलंकेतही तेथील जनतेला सामोरे जावे लागत असलेल्या आर्थिक दिवाळखोरीमुळे महागाईचा सामना करावा लागत होत होता. त्यामुळे कातावलेल्या जनतेने थेट श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. तसेच अध्यक्षीय निवासस्थानावर मोर्चाही काढला. त्यामुळे अखेर तेथील जनतेचा रोष पाहुन श्रीलंकेच्या अध्यक्षांनी देश सोडून पलायन केल्याची घटना घडली. आता श्रीलंकेनंतर आता बांग्लादेशच्या सत्ताधाऱ्यांना अशा पध्दतीने सत्ता सोडावी लागली हे विशेष.

Exit mobile version