Marathi e-Batmya

संरक्षण प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

मराठी ई-बातम्या टीम
तामीळनाडूतील कुनूर येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह ११ जणांचे निधन झाल्याची माहिती वायुदलाच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून देण्यात आली.
बिपीन रावत हे सपत्नीक निलगिरी हिल्स येथील वेलींगटन या लष्करी दल महाविद्यालयात खास व्याख्यान देण्यासाठी गेले होते. मात्र तेथून परतताना हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. त्यातच या दोघांचा मृत्यू झाल्याचे वायुदलाने सांगितले.
तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही वायुदलाने दिल्याचे यावेळी जाहिर केले.
वायुदलाच्या या हेलिकॉप्टरला अपघात कसा झाला याची अजूनही कोणतीही अधिकृत माहिती किंवा त्याविषयीचा संशय अद्याप वायुदलाकडून व्यक्त करण्यात आलेला नाही. मात्र या घटनेची चौकशी केल्यानंतर यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिपीन रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्या ११ जणांचा यात मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटल्याचे किंवा त्यांची नावे अद्याप वायुदलाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेच आग लागल्याने आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याने या अपघातात कितीजण वाचले असतील याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच या दुर्घटनेत कितीजण वाचले किंवा कितीजण जखमी झाले याबाबतचा अंदाजही येत नव्हता.
मात्र दुपारपासूनच रावत यांचा अपघात झाल्याचे कळताच राष्ट्रपती कोविंद यांच्यासह काही राज्यपालांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने रावत यांच्यासोबत काहीतरी बरे वाईट झाल्याची शंका अनेकांच्या मनात चुकचुकली होती. परंतु अधिकृतरित्या त्यासंदर्भात कोणीही स्पष्ट बोलत नव्हते. मात्र संध्याकाळी वायुदलाने ट्विटरवरून रावत पती-पत्नींचे निधन झाल्याचे जाहिर केले.

 

 

Exit mobile version