Marathi e-Batmya

केदारनाथ मंदिराजवळ हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू

रविवारी (१५ जून २०२५) पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये सर्व सात जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये सुमारे ४० दिवसांत हा पाचवा हेलिकॉप्टर अपघात आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीसाठी उड्डाण करत होते. मात्र हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बद्री-केदार मंदिर समितीचे प्रमुख हेमंत द्विवेदी यांनी केली. मृतांमध्ये १० वर्षांचा मुलाचा समावेश आहे.

हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे असल्याचे सांगत येत असून हेलिकॉप्टरचा अपघात केदारघाटीतील गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले आणि त्यास आग लागली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी X ला माहिती दिली आणि सांगितले की, “रुद्रप्रयाग जिल्ह्यात हेलिकॉप्टर अपघात झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ SDRF, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे सांगितले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डिजीसीएने सांगितले की, त्यांनी चार धाम येथे हेलिकॉप्टर ऑपरेशन्सची वारंवारता आधीच कमी केली आहे आणि पुढील कारवाईसाठी वाढीव देखरेख आणि ऑपरेशनचा आढावा घेत आहेत.

डिजीसीएने दिलेल्या निवेदनानुसार “श्री केदारनाथ जी- आर्यन हेलिपॅड, गुप्तकाशी येथे अपघात झाला. त्यात ५ प्रवासी, एक बाळ आणि एक क्रू मेंबर होते. हेलिकॉप्टरने गुप्तकाशी येथून सकाळी ५:१० वाजता उड्डाण केले आणि श्री केदारनाथ जी हेलिपॅडवर ५:१८ वाजता लँडिंग केले. हेलिकॉप्टर पुन्हा ५:१९ वाजता गुप्तकाशीसाठी उड्डाण केले आणि गौरीकुंडजवळ कोसळले,” असल्याचे सांगितले.

“खबरदारीचा उपाय म्हणून, डीजीसीएने आधीच चार धाम येथे हेलिकॉप्टर ऑपरेशन्सची वारंवारता कमी केली आहे, वाढीव देखरेख करत आहे आणि पुढील कारवाईसाठी ऑपरेशनचा आढावा घेत आहे. या अपघाताची एएआयबीकडून चौकशी केली जाईल,” असेही सांगण्यात येत आहे.

केदारनाथ खोऱ्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मुख्य सचिव आनंद बर्धन, पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक सचिव सचिन कुर्वे, आपत्ती सचिव विनोद कुमार सुमन, उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी राज्यात हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी कडक सूचना जारी केल्या आहेत.

मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी  म्हणाले की, राज्यात हेलिकॉप्टर सेवांच्या संचालनासाठी एक कठोर एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करावी, ज्यामध्ये हेलिकॉप्टरच्या तांत्रिक स्थितीची संपूर्ण तपासणी अनिवार्य करावी. हेलिकॉप्टर ऑपरेशन्सपूर्वी हवामान स्थिती देखील तपासावी. मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जी हेलिकॉप्टर ऑपरेशन्सच्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षित पैलूंचा सखोल आढावा घेतल्यानंतर एसओपी तयार करेल.

मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी असेही निर्देश दिले आहेत की, राज्यात भूतकाळात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती मागील हेलिकॉप्टर अपघातांच्या तसेच रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या प्रत्येक पैलूची सखोल चौकशी करेल आणि आपला अहवाल सादर करेल. ही समिती प्रत्येक घटनेची कारणे सखोलपणे तपासेल आणि दोषी व्यक्ती किंवा संस्थांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारस करेल.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी म्हणाले की, राज्यातील हेलिकॉप्टर सेवेचे महत्त्व तीर्थयात्रा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवांसाठी खूप मोठे आहे, त्यामुळे यामध्ये सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version