Marathi e-Batmya

पहलगाम हल्ल्यातील तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम कुरणात मंगळवारी (२२ एप्रिल, २०२५) दुपारी पर्यटकांची हत्या करणाऱ्या सुमारे चार ते सहा सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटात दोन काश्मिरी पुरुष असल्याचा संशय आहे, असे सरकारी सूत्रांच्या हवाल्याने द हिंदूच्या संकेतस्थळाने वृत्त दिले.
पुरुष पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्या धर्मावर आधारित असलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत तब्बल २६ लोक मारले गेल्याची माहिती पुढे आली आहे.

अनंतनागचे आदिल गुरी आणि दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अहसान म्हणून ओळखले जाणारे दोन स्थानिक २०१८ मध्ये पाकिस्तानात गेले होते. “दोघांनी अलीकडेच आणखी तीन ते चार पाकिस्तानी नागरिकांसोबत घुसखोरी केली. आम्हाला त्यांच्या हालचालींबद्दल काही माहिती मिळाली,” असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तीन पाकिस्तानींची रेखाचित्रे जारी केली. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, दहशतवादी खोट्या गणवेशात आले होते आणि त्यांच्याकडे एके सिरीजच्या रायफल होत्या.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी हेल्मेट घातलेले कॅमेरे होते आणि त्यांनी हल्ल्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हल्ल्याचे ठिकाण निवडण्यात आले कारण त्यात रस्ता जोडणीचा अभाव आहे आणि तेथे पायी किंवा पोनीने प्रवेश केला जाऊ शकतो, असे सांगितले.
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी श्रीनगरला भेट देत बुधवारी पोलीस मुख्यालयात पीडित कुटुंबियांची भेट घेतली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स X वर पोस्ट केले, “जड अंतःकरणाने, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना अंतिम श्रद्धांजली. भारत दहशतवादाकडे झुकणार नाही. या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही.” असा इशाराही यावेळी दिला.

त्यानंतर त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळी बैसरनला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. अमित शाह संध्याकाळी दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Exit mobile version