Marathi e-Batmya

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर जम्मू काश्मीरला भेट देत म्हणाले, भारताचा अविभाज्य भाग

जम्मू-काश्मीरबाबतच्या भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचे जोरदार समर्थन करत, अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी श्रीनगरला दिलेल्या आपल्या पहिल्या भेटीदरम्यान या केंद्रशासित प्रदेशाचे वर्णन “भारताचा एक महत्त्वाचा भाग” असे केले. कलम ३७० रद्द झाल्यानंतर आणि पहलगाम येथील हल्ल्यानंतर एखाद्या अमेरिकन दूताची या केंद्रशासित प्रदेशाला दिलेली ही पहिलीच स्वतंत्र भेट होती; या भेटीदरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली आणि त्यानंतर हे महत्त्वपूर्ण विधान केले.

यावेळी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर पुढे म्हणाले की, “येथे येऊन खूप आनंद होत आहे… हा भारताचा एक महत्त्वाचा भाग आहे. मी येथे पहिल्यांदाच आलो आहे. हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. येथे आल्याचा आणि हे ठिकाण पाहिल्याचा मला खूप आनंद होत आहे,” अशा शब्दांत आपला उत्साह व्यक्त केला. या प्रदेशात पाकिस्तानकडून वारंवार केल्या जाणाऱ्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे या भारताच्या अधिकृत भूमिकेला गोर यांचे हे विधान बळकटी देणारे मानले जाईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या या अमेरिकन राजदूताने असेही स्पष्ट केले की, अमेरिका जम्मू-काश्मीरसाठी असलेल्या सर्वोच्च पातळीच्या ‘प्रवास इशाऱ्या’चा (travel warning) पुनर्विचार करेल. सध्या, दहशतवादाच्या धोक्यांमुळे अमेरिकेने जम्मू-काश्मीरसाठी ‘लेव्हल ४’ म्हणजेच “प्रवास करू नये” (do not travel) असा सल्ला जारी केला आहे.

या संदर्भात सर्जिओ गोर यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरते. सर्जिओ गोर म्हणाले, “आम्ही सध्या लागू असलेल्या आणि अमेरिकेकडून शिफारस करण्यात आलेल्या प्रवास इशाऱ्याची पातळी कमी करता येईल का, याचा विचार करू… हा परिसर अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सुरक्षित बनवण्यासाठी काही उल्लेखनीय पावले उचलली गेली आहेत.”

सर्जिओ गोर पुढे म्हणाले, मला वाटते की अनेक अमेरिकन नागरिकांना येथे यायला आणि येथील सौंदर्य व संधींचा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल.

सर्जिओ गोर यांच्या भेटीच्या काही तास आधी, माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी (PDP) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांना अमेरिकेचा कठोर प्रवास सल्ला मागे घेण्याची किंवा त्याचा आढावा घेण्याची विनंती केली होती. खोऱ्यातील हजारो कुटुंबे उपजीविकेसाठी पर्यटनावर अवलंबून आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

जर अमेरिकेने हा सल्ला शिथिल केला, तर परदेशी पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाण म्हणून काश्मीरची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल.
गेल्या वर्षी तणावपूर्ण बनलेल्या अमेरिका-भारत संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, त्या अमेरिकन दूताने ओमर अब्दुल्ला यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली. ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये सर्जिओ गोर यांनी सांगितले की, या चर्चेत काश्मीरसाठी अब्दुल्ला यांची ‘प्राधान्ये’ आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याचे मार्ग यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. “आम्ही आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि दोन्ही राष्ट्रांना परस्पर लाभ देणाऱ्या संधी निर्माण करण्याच्या मार्गांवर चर्चा केली, असे ट्विट सर्जिओ गोर यांनी केले.

दुसरीकडे, पर्यटन, फलोत्पादन आणि ‘नवीन अर्थव्यवस्था’ (new economy) या क्षेत्रांत अमेरिकेसोबतचा सहभाग वाढवण्यावर ही चर्चा केंद्रित होती, असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “ही एक अतिशय चांगली बैठक होती… अर्थातच काही जुने प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी आम्ही कालांतराने प्रयत्न करू. आम्हाला आशा आहे की, आगामी काळात अमेरिका आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील संबंध अधिक व्यापक आणि दृढ होतील, असे अधोरेखित केले.

गुरुवारी सर्जिओ गोर लडाखला भेट देणार आहेत. २०२० मधील गलवान संघर्ष आणि चीनसोबतच्या सीमावादानंतर एखाद्या अमेरिकन दूताची या प्रदेशाला होणारी ही पहिलीच भेट असेल.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर सात वर्षांनी अमेरिकन दूताची ही महत्त्वपूर्ण भेट होत आहे.

शिवाय, ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा शेजारील पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) लष्कराच्या अत्याचारांविरुद्ध नागरिकांच्या हिंसक निदर्शनांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. श्रीनगरमधील मुक्कामादरम्यान गोर व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरी समाजातील सदस्यांशी संवाद साधू शकतात, अशीही चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होत असताना आणि दहशतवादविरोधी उपाययोजनांबाबत सर्जिओ गोर व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात अलीकडेच चर्चा झाल्यानंतर ही भेट होत आहे. अमेरिकन दूताची ही भेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, १५ वर्षांहून अधिक काळानंतर अमेरिकेचे विद्यमान राजदूत आणि जम्मू-काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्यातील ही पहिलीच बैठक असेल. यापूर्वी अशी बैठक २०११ मध्ये झाली होती, जेव्हा तत्कालीन अमेरिकन राजदूत टिमोथी रोमर यांनी ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली होती.

तसेच, अमेरिकन दूताची काश्मीरला झालेली अशी स्वतंत्र भेट यापूर्वी २०१८ मध्ये केनेथ जस्टर यांनी दिली होती; पीडीपी-भाजप सरकार पडल्यानंतर काही काळानंतर ही भेट झाली होती. जस्टर यांनी २०२० मध्येही काश्मीरला भेट दिली होती, परंतु ती अनेक देशांच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या भेटीमुळे अमेरिकन दूत आणि जम्मू-काश्मीर सरकार यांच्यातील थेट संवादाची पुन्हा सुरुवात होत आहे.

तत्पूर्वी, ओमर अब्दुल्ला यांनी या भेटीचे अति-महत्त्व (hype) करण्यास नकार दिला आणि स्पष्ट केले की ते अमेरिकन दूताकडे काश्मीरबाबत कोणतीही तक्रार मांडणार नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये ‘नॅशनल कॉन्फरन्स’ची सत्ता आल्यापासून, ओमर अब्दुल्ला सातत्याने जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा (स्टेटहूड) पूर्ववत करण्याची मागणी करत आहेत.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, वॉशिंग्टन आपल्या समस्या सोडवणार नाही, तर केंद्र सरकारच त्या सोडवेल. तक्रार करण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून घेणे मला अधिक योग्य वाटते, असे स्पष्ट करत देशातील समस्यांबाबत दुसऱ्या देशाच्या दूताकडे तक्रार करणे ही आपली सवय नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आपल्या समस्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही, असेही नमूद केले.

Exit mobile version