मुंबई : प्रतिनिधी
आज केवळ महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानच्या कुस्ती क्षेत्रासाठी सोन्याचा दिवस आहे. पैलवान राहुल आवारे याने ५७ किलो वजनी गटात तुल्यबळ लढती जिंकत सुवर्णपदक मिळवले. राहुलचे यश हे खरोखर असाधारण असे आहे. रूस्तुम ए-हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार मामांनी बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातल्या या पोराला पोटाशी धरून पुण्यात आणले आणि त्याच्या सुप्त गुणाला फुंकर मारायला सुरवात केली.
हजारो लाखो लोकात एखाद्यात असा गुण पहायला मिळतो. ज्यामुळे गुरूच्या आंतरिक शक्तीला अनामिक हाक ऐकू येते.राहुलच्यात मामांना सुद्धा काहीतरी वेगळेपण वाटले होते. राहुल सारखा गावात राहिलेला व दंगा मस्तीत रममान होणाऱ्या मुलाला शिस्त लावणे तोंडचा विषय नव्हता. मामांनी ही अवघड कामगिरी मायेने लीलया पार पाडली.
२००९ ची कॉमनवेल्थ गेम्स ची ट्रायल दिल्लीत झाली. ज्यावेळी मामा हयात होते. राहुल सारख्या नवख्या पोराने अमित दहिया सारख्या कसलेल्या अनुभवी मल्लासोबत काटा टक्कर दिली. मात्र राहुलला २ गुणांनी पराभूत व्हावे लागले. मामांच्या समोर रडत उभा असलेल्या राहुलला मामांनी मायेच्या शब्दात समजावत सांगितले की, तू नक्की एक दिवस या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकशील.
मात्र त्यानंतर मामांचे आकस्मित जाणे हे कुस्तीक्षेत्रासाठी खूपच दुःखाचे आणि जीवघेणे ठरले. राहुल सारख्या भावनिक मुलाच्या मनाच्या दुःखद वेदना समजून घेणे, खरोखर सर्वांसाठी अवघड होते. मात्र मामांच्या नंतर त्याच तोलामोलाचा तपस्वी व्यक्तीने राहुलच्या खांद्यावर मायेचा हात ठेवला. ते म्हणजे अर्जुनवीर काकासाहेब पवार. काकांच्या प्रेमळ मात्र कडव्या शिस्तीखाली राहुल मामा गेल्याचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र जखमा ह्या कितीही बुजल्या तरी व्रण मात्र कायमचे राहतात.
राहुलच्या श्वासात, नसानसात केवळ हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या स्वप्नासाठी जगणे शिल्लक होते.
दुःखाचा आगडोंब विवेकाने विझवत राहुल ने पुन्हा लंगोट आवळला….
२०१४ ची कॉमनवेल्थ चाचणी घेण्यात आलीच नाही. चाचणी न घेता परस्पर संघ पाठवला गेला ज्यात राहुल नव्हता. का..? का..कशासाठी..कारण काय हे दिल्लीला विचारायचे धाडस कोणाच्यात नव्हते व आजही नाही. राजकारणाच्या घाणेरड्या प्रथेचा फार मोठा धक्का खेळाडूंना आजवर बसत आला आहे त्यावर कोणीही खुल्या मनाने बोलत नाही.
राहुलची ८ वर्षे केवळ मामांच्या आठवणीत गेली…मामा देहाने गेले. मात्र त्यांच्या विचारांनी इहलोक सोडून जाणे पसंत केले नसावे…त्यांच्या स्मृती राहुलच्या आसपास घुटमळत राहिल्या असाव्यात म्हणून की काय कुस्तीसारख्या ठराविक वयातच चांगली कामगिरी दाखवता येणाऱ्या खेळात राहुल अव्याहतपणे सराव करतच होता, घाम गाळतच होता. या दरम्यान ऑलिंपिक चे घाणेरडे राजकारण राहुल ला भोगावे लागले हे सर्वश्रुत आहे.
२०१८ ला तब्बल ९ वर्षांनी राहुलने कॉमनवेल्थ स्पर्धेच्या निवड चाचणीत अमित दहिया व संदीप तोमर या दोन ऑलिंपिक मल्लांवर लीलया विजय मिळवत स्पर्धेत स्थान पक्के गेले. याच दरम्यान सलग सहा वेळा सिनियर नॅशनल कुस्तीत सुवर्णपदके मिळवण्याची बहाद्दूरी केली. आणि आजच त्याने तुल्यबळ लढती जिंकत सुवर्णपदक मिळवले.
राहुल च्या डोळ्यात अश्रू होते..हात जोडले होते…खांद्यावर भारताचा तिरंगी ध्वज होता…मात्र या सर्वांच्या पाठीमागे मला ते खोल डोळे दिसले…जे सुप्तरुपात माहिती नाही. कित्येक वर्षे राहुलची पाठराखन करत आहेत…जणू त्याच्या प्रत्येक संकटात ते धीर देत आले आहेत…ते डोळे म्हणजे रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांचे……
म्हणूनच राहुल इतक्या संकटांना, इतक्या जखमांना,इतक्या अपयशाना न डगमगता आजही छातीचा कोट करून उभा आहे…..
आपल्या सर्वांसाठी हे राहुल चे एक सुवर्णपदक होते…मात्र राहुल साठी मामांच्या व काकांच्या स्वप्नाची पहिली पायरी होती. येणाऱ्या २०२० टोकियो ऑलिंपिक मध्ये राहुल जेव्हा पदकांची कमाई करेल तेव्हा मात्र सर्वांच्या आशा त्याच्या दृष्टीने पूर्णत्वास जातील व त्यासाठी राहुल जीवतोड मेहनत सुद्धा घेईल….
( पै.गणेश मानुगडे, कुस्ती-मल्लविद्या यांच्याकडून साभार)
