Marathi e-Batmya

हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर

मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून याच तारखांना मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळला. आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातमध्ये आज मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. पण उद्यापासून मात्र पाऊस ओसरले अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

विदर्भाला आज हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात ९ तारखेला पावसाचा जोर पहायला मिळेल पण त्यानंतर पुढचे २ दिवस पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज व्यक्त करत पण यानंतर विदर्भातही पाऊस सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला.

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ आठवड्यांच्या अंदाजानुसार, ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग, विदर्भाचा काही भाग येथे पाऊस पडू शकतो. २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस तरी पावसामुळे दिलासा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Exit mobile version