Breaking News

भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ कोयना, खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरण क्षेत्रातील अतिवृष्टी

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, संबधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. कोयना धरणक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टीच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवीर नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ ची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही केल्या.

शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करावी. त्यांना संपूर्ण मदत, सहकार्य करावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कोयना धरणातूनही सध्या ५ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावांना तसेच तेथील पुररेषेलगतच्या नागरिकांनीही आवश्यक काळजी घ्यावी, प्रशासनानेही त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.

Check Also

दुबईच्या वाळवंटात पावसाचा महापूर…विमानतळ, रस्ते, मॉल्समध्ये पाणीच पाणी

आतापर्यंत दुबई आणि बहरीन हे तेथील राजेशाही राजवट आणि तेथील वाळवंटी भूभाग, त्याचबरोबर तेथील कच्च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *