Marathi e-Batmya

वरुणराजाच्या आगमनाने छत्र्या बाहेर तर थंडी पळाल्याने स्वेटर कपाटात

मुंबई: प्रतिनिधी

डिसेंबर महिना म्हटलं की गुलाबी थंडीचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. मात्र पर्यावरणातील बदलामुळे यंदा डिसेंबर उजाडला तरी वरूणराजाने अजून एक्झिट घेतली नाही. त्यामुळे आज महिन्याचा पहिला दिवस असताना मुंबईत सकाळपासूनच ढगांनी गर्दी  करत वरूणराज्याचे आगमन झाले. त्यामुळे सुर्यनारायणाला ढगांच्या आड लपण्याची नामी संधी मिळत सुट्टीवर जाणे भाग पाडले. तसेही थंडीचा मोसम असताना अद्याप मुंबईकरांना थंडीचा अनुभव काही केल्या घेता आले नाही. आणखी पुढील दोन दिवस मोघगर्जनेसह वरूण राजा आपली हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

आज सकाळीच पावसाने आपली हजरी लावल्याने थंडीसाठी बाहेर काढलेले स्वेटर पुन्हा कपाटात ठेवत पुन्हा गुंडाळून ठेवलेल्या छत्र्या बाहेर काढण्याची पाळी मुंबईकरांवर आली.

दोन दिवसांपूर्वी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा होती. मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे, धुळे आणि पालघरमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला. तसेच मुंबई, ठाण्यात यलो अलर्ट तर पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. बुधवारी सकाळपासून आकाशात ढग दाटून आले आणि पावसाळा सुरुवात झाली. त्यामुळे अनेकांना छत्र्या बाहेर काढून कामावर जावे लागले. छत्री किंवा रेनकोट शिवाय बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. मुंबई व उपनगरांत पावसाने हजेरी लावत दिवसभर रिपरिप चालू ठेवली. ढगाळ वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले. तरुणाईने चौपाट्या, समुद्र किना-यावर रिमझिम पावसात आनंद लुटला.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, लक्षद्वीपच्या जवळ चक्रीवादळ आहे. यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण मध्ये पावसाचे वातावरण असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. तर उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मात्र मच्छिमारांनी या परिस्थितीत समुद्रात जावू नये असा इशाराही हवामान विभागाने दिला.

 

 

 

 

Exit mobile version