२६५ तालुक्यांत ट्रिगर-१ निकषांनुसार दुष्काळ जाहीर करून विविध १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नांदेड: मुदखेड, मुखेड, चंद्रपूर: जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदिया: आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, वर्धा: कारंजा, भंडारा: मोहाडी, तुमसर, नाशिक: त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, सातारा: पाटण, सांगली: शिराळा, वाळवा.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदींनुसार ही पडताळणी करण्यात येणार आहे. उपग्रह छायाचित्रे, नकाशे आणि संगणकीय माहितीच्या आधारे प्राप्त झालेल्या निष्कर्षांची प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे खातरजमा केली जाणार आहे. प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण केल्यामुळे पिकांची प्रत्यक्ष स्थिती आणि दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. या प्रक्रियेमुळे तांत्रिक माहिती आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती यांची सांगड घालून दुष्काळाचे अधिक अचूक चित्र समोर येईल. परिणामी, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी शासनाला वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होणार आहे.
………………
केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने देमनी शिवारात पाहणी केली.
देमनी येथील शेतकरी विलास देविदास शिंदे यांच्या गट ८४ मधील १ हे २० आर क्षेत्रात सोयाबीन पिकाची लागवड होती. पावसाअभावी पूर्ण पीक करपून गेले आहे. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्व स्थिती जाणून घेतली.
कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
000
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी
- नाणेगाव, किणगाववाडी, जामखेड परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली वस्तुस्थिती
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नाणेगाव तसेच अंबड तालुक्यातील किणगाववाडी आणि जामखेड परिसरातील शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, पाण्याची उपलब्धता, संभाव्य पीक नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन माहिती घेत पथकाने दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेतली.
कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.
यावेळी आमदार नारायण कुचे, राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत चौधरी, बदनापूर उपविभागीय अधिकारी लता बागुल आणि घनसावंगी-अंबड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी उपस्थित होते.
बदनापूर आणि अंबड शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी; नुकसानीची घेतली माहिती
केंद्रीय पथकाने बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथे शेतकरी शिवाजी डोंगरे यांच्या शेतातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. अंबड तालुक्यातील किणगाववाडी येथे शेतकरी उदल हरीचंद शिहिरे यांच्या शेतातील करपलेली मोसंबीची झाडे आणि कोरडे पडलेली शेततळे यांची स्थिती पाहिली. याच परिसरातील शिवलाल गांगे यांच्या शेतातील अदरक पिकाची, तर बालचंद गांगे यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली.
जामखेड येथे शेतकरी संतोष गुरुके यांच्या शेतातील बाजरी पिकाची, तसेच गणेश जुंजार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीची पाहणी करून पाण्याच्या उपलब्धतेअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेण्यात आली. याशिवाय अंबड तालुक्यातील कोरड्या पडलेल्या गल्हाटी मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न, सिंचनासाठी घटलेली पाण्याची उपलब्धता आणि मच्छीमारीवर उपजीविका करणाऱ्या १०६ कुटुंबाच्या समस्यांची माहिती पथकाने घेतली.तसेच प्रकल्प परिसरातील उत्तमराव साळुंके यांच्या शेतातील कापूस तसेच अन्य शेतांमधील ऊस पिकांचीही पाहणी करून पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
नाणेगाव, किणगाववाडी आणि जामखेड परिसरातील विविध पिकांची पाहणी करताना केंद्रीय पथकाने पिकांची वाढ, पावसाअभावी झालेली हानी आणि संभाव्य उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची प्रत्यक्ष माहिती घेतली. खरीप हंगामातील पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पथकाने संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. पर्जन्यमान, पावसातील खंड, उपलब्ध पाण्याची स्थिती आणि त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम याबाबत शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता यासंदर्भातील अडचणी पथकासमोर मांडल्या. प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांची जाणीव करून देत शेतकऱ्यांनी आपल्या परिस्थितीची माहिती दिली.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती आणि दुष्काळसदृश स्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष शेतशिवारातील पाहणी, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांशी झालेल्या संवादाच्या आधारे केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथक शासनाला परिस्थितीचा अहवाल सादर करणार आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून नुकसानभरपाई, आवश्यक आर्थिक मदत आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.
00000
केंद्रीय पथकाकडून अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा
- वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचा वाशिम येथे बैठकीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर पथकाने वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
केंद्रीय पथकात वरिष्ठ अधिकारी अर्जेश कुमार मधोक, महेश कुमार, सीमा रानी, संजय मीना आणि अभय भारत यांचा सहभाग आहे. पथकातील सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि कृषी सहसंचालक गणेश घोरपडे आदी उपस्थित होते.
केंद्र शासनातर्फे राज्यातील दुष्काळ पाहणीसाठी ११ सदस्यांचे पथक नियुक्त करण्यात आले असून, त्यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून सादरीकरण
बैठकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांकडून जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले. पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली स्थिती, पीक नुकसान, पाणी उपलब्धता व टँकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता या बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले. विभागातील पाचही जिल्ह्यातील पावसाची स्थिती, शेतीपिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती तसेच आगामी सात महिन्यांसाठीच्या संभाव्य परिस्थितीची माहिती यावेळी पथकाने घेतली.
विभागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. उपलब्ध जलस्त्रोत, तळी, गावांमधील पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्य:स्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. कृषी सहसंचालक घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सूत्रसंचालन केले.
विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी
बैठकीनंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी केली.
पथकाकडून दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि प्रत्यक्ष परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. त्यानुसार दुष्काळाची वस्तुस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार आहे.
केंद्रीय पथकाने वाशिम जिल्हा दौऱ्यात विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. वाशीम तालुक्यातील सुपखेला येथे दयाराम विठ्ठल राऊत यांच्या शेतीला भेट देऊन नुकसान पाहणी करण्यात आली. त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाहणी करून परिसरातील पाणीटंचाईचा आढावा पथकाने घेतला, त्याचप्रमाणे कोठारी येथे दिलीप दुबळगुंड यांच्या शेताची पाहणी करण्यात आली.
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात पथकाने मानोरा तालुक्यातील कुपटा येथे मोहम्मद सादिक मोहम्मद शफी यांच्या, तसेच कारंजा तालुक्यातील काळीकारंजा येथे त्र्यंबक फकिरा गुल्हाने व पानविहीर येथे रमेश भाऊराव थेर यांच्या शेताला भेट देऊन पीक नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्याकडे रवाना झाले.
०००
