Marathi e-Batmya

मराठवाड्यात दिवसभर गारपीट सुरूच

औरंगाबाद: प्रतिनिधी

मराठवाड्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यात दिवसभर गारपीट सुरुच असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दोन जनावरे दगावली आहेत. या संदर्भात गारपीटग्रस्त भागात वेगाने पंचनामे करण्यासाठी स्थळपाहणी सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिली.

जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील ९० गावांत गारपीट झाली आहे. या मध्ये जालना जिल्ह्यातील वंजार येथील नामदेव शिंदे (६२) या वृध्दाचा वीज पडून मृत्यू झाला. तर हिंगोली जिल्ह्यातील इंचा या गावात एका वासराच्या अंगावर वीज पडली तर कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे वीज पडून एक गाय दगावली. या नुकसानीची स्थळ पाहणी करण्याकरीता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून युध्दपातळीवर स्थळपाहणी सुरु असून पंचनामे करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.

यात जालना जिल्ह्यातील ५१ गावे  बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा अंबड या तालुक्यातील आहेत. तर परभणी शहर आणि जिंतूर तालुक्यातील असोला, धमधम, ओझर या ठिकाणी गारपीट झाली आहे. सेलू तालुक्यातील शिराळा, ब्रम्हेवाडी, गोमेवाडी, हडेगाव या गावांमधे गारपीट झालीय. बीड जिल्ह्यातील पिंपळनेर, वायघट, वाडा या गावांचा समावेश आहे.

Exit mobile version