Marathi e-Batmya

सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, तू छान, हुशार, दिसतेस, मेसेजेस पाठवणे विनयभंगच

तू खूप हुशार दिसतेस. तू गोरी आहेस, तू बारीक आहेस. मला तू आवडतेस, तू विवाहित का ? असे आणि या प्रकारचे संदेश रात्री उशिरा व्हाट्सअॅपवरून एखाद्या अज्ञात महिलेला पाठवणे तिच्या विनयशीलतेचा भंग किंवा अपमान करण्यासारखे आहे, असा निर्वाळा बोरिवली सत्र न्यायालयाने नुकताच दिला, तसेच, माजी नगरसेविकेला रात्री उशिरा व्हाट्सअॅपवरून संदेश पाठवणाऱ्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली तीन महिन्यांची शिक्षा कायम ठेवली.

बोरिवली परिसरातील तत्कालीन नगरसेविकेला आरोपींने २६ जानेवारी २०१६ रोजी व्हॉट्सअॅपवरून संदेश पाठवले. त्यात, तू झोपलीस का ? तुझे लग्न झाले आहे का ? तू छान दिसतेस. तू खूप गोरी आहेस. मला तू आवडतेस. माझे वय ४० वर्षे आहे. मी तुला उद्या भेटतो, असे लिहिले होते. तक्रारदार महिलेने पतीला याबाबत सांगितल्यानंतर त्याने लागलीच संबंधित क्रमांकावर फोन केला. त्यावेळी, आरोपी नरसिंह गुडेने फोन उचलला नाही. मात्र, माफ करा, रात्रीच्या वेळी फोन घेत नाही. मला  व्हॉट्सअॅप चॅटिंग करायला आवडते, आपण ऑनलाईन बोलू शकतो, असा तक्रारदार महिलेला पुन्हा संदेश पाठवला आणि त्यासह काही अश्लील छायाचित्रे पाठवल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीस डी. जी. ढोबळे यांनी गुडेबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल योग्य ठरवताना नमूद केले.

आरोपीने तक्रारदार महिलेला पाठवलेले संदेश आणि छायाचित्रे खरेच अश्लील आहेत. तसेच, आरोपीचे तक्रारदार माजी नगरसेविकेसह तिच्या पतीशी काहीही संबंध नसल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले. कोणतीही विवाहित महिला किंवा तिचा पती अनोळखी व्यक्तीकडून रात्री ११ ते साडेबारा दरम्यान पाठवलेले अशाप्रकारचे संदेश आणि अश्लील छायाचित्रे खपवून घेणार नाहीत, आरोपीने तक्रारदार महिलेला पाठवलेल्या संदेशातील शब्द आणि वर्तणूक ही तिचा विनयभंग करणारे आहेत, तसेच, अश्लील छायाचित्र आणि आक्षेपार्ह संदेश पाठवण्याची कृती शिक्षेसाठी पात्र ठरते, असेही न्यायालयाने म्हटले.

महिला प्रतिष्ठा पणाला लावणार नाही 

अशी घटना घडलीच नाही. तक्रारदार महिलेने राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा आरोपीकडून करण्यात आला, न्यायालयाने मात्र आरोपीचा दावा फेटाळला व कोणतीही महिला खोटे प्रकरण दाखल करून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. त्यामुळे. तक्रारदार महिलेसह तिच्या पतीने दिलेली साक्ष आणि कागदोपत्री पुराव्यांवरून आरोपीने तिला संबंधित दिवशी अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवल्याचे सिद्ध होते, असेही सत्र न्यायालयाने आरोपी गुडे याची शिक्षा कायम ठेवताना प्रामुख्याने नमूद केले.

Exit mobile version