जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या करणारा रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरी हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तसेच, उपचारांसाठी नागपूर मानसिक रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता असल्याचे अकोला कारागृह प्रशासनाने गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाला पत्राद्वारे माहिती दिली.
चेतनवर सध्या दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. १९ डिसेंबर रोजी चेतनची तब्येत बिघडली होती. त्यामुळे, त्याला वैद्यकीय उपचारांसाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याची तपासणी केल्यानंतर, त्याच्यात मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाची लक्षणे आढळून आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याची माहिती अकोला कारागृह अधीक्षकांनी सत्र न्यायालयाला पत्राद्वारे दिली.
चेतनला पुढील उपचारांसाठी नागपूर मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची शिफारसही कारागृह अधीक्षकांनी पत्राद्वारे केली आहे. चेतनच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी कारागृह अधीक्षकांच्या दाव्याला विरोध केला आहे. तसेच, चेतनविरूद्ध दाखल आरोपपत्रात तो मानसिकरीत्या आजारी असल्याचे कुठेच नमूद नसल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले व अकोला कारागृह अधीक्षकांचे पत्र रद्द करण्याची मागणी केली. तर त्याच्यावरील खटल्याच्या दृष्टीनेही सोयीचे ठरण्यासाठी चेतनला ठाण्यातील मानसिक रुग्णालयात हलविण्याचा पर्याय ये सरकारी वकिलांनी न्यायालयाला सुचविला आहे.
