पीएनबी बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी आणि हिरेव्यापारी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्स लिमिटेडच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास विशेष न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली.
मेहुल चोक्सीच्या या मालमत्तेत सांताक्रुझमधील सात फ्लॅट, वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भारत डायमंड बोर्सशी संबंधित व्यावसायिक गाळा आणि सुरतस्थित डायमंड पार्कमधील कार्यालयासह दुकानाचा समावेश आहे. या मालमत्तेची मूल्यांकन प्रक्रिया पार पाडल्यानंतर, संबंधित कायद्यानुसार योग्य प्रक्रियेचे पालन करून ताब्यात असलेल्या मालमत्तेचा लिलाव करावा. तसेच, लिलावातून मिळालेले पैसे आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपातं ठेवावेत व खटल्याच्या अंतिम निकालानुसार वितरित करावे, असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मेंजोगे यांनी उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले.
ठेवीदारांच्या समितीने एप्रिल २०१९ मध्ये ठरावाद्वारे अवसायन प्रक्रिया सुरू केली आणि केंद्रीय कंपनी लवादाने त्यासाठी अवसायनक नियुक्त केला. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष न्यायालयाने अवसायनकाला चोक्सीच्या कंपनीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर, अवसायनकाने मालमत्तेचा लिलाव करू देण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली. ईडीच्या या मागणीला आक्षेप नसल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर, न्यायालयाने चोक्सीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास परवानगी दिली.
