Marathi e-Batmya

१० वर्षात कर गोळा होण्याच्या प्रमाणात १८२ टक्क्याची वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या १० वर्षांच्या कालावधीत २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष कर संकलन १८२ टक्क्यांनी वाढून १९.६० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या ताज्या ‘टाइम सीरीज डेटा’मध्ये असे दिसून आले आहे की २०२३-२४ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट कर संकलन १० वर्षांत दुप्पट होऊन ९.११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. या कालावधीत वैयक्तिक आयकर संकलन चार पटीने वाढून १०.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

२०१४-१५ मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या वर्षात प्रत्यक्ष कर संकलन सुमारे ६.९६ लाख कोटी रुपये होते. यामध्ये सुमारे ४.२९ लाख कोटी रुपये कॉर्पोरेट कर आणि २.६६ लाख कोटी रुपये वैयक्तिक आयकर समाविष्ट आहेत.

२०१४-१५ आर्थिक वर्षात ४.०४ कोटींहून अधिक भरलेल्या आयकर रिटर्नची संख्या (सुधारित रिटर्नसह) २०२३-२४ मध्ये ८.६१ कोटींहून अधिक झाली आहे.

प्रत्यक्ष कर-ते-जीडीपी गुणोत्तर २०१४-१५ मधील ५.५५ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये ६.६४ टक्क्यांपर्यंत वाढले. जीडीपी GDP वाढीच्या संदर्भात महसूल जमा करण्याच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करणारी कर उछाल १० वर्षांच्या कालावधीत ०.८६ वरून २.१२ पर्यंत वाढली आहे.

करदात्यांची संख्या मूल्यांकन वर्ष (AY) २०१४-१५ मध्ये ५.७० कोटींवरून २०२३-२४ AY मध्ये १०.४१ कोटी झाली.

Exit mobile version