Marathi e-Batmya

नवीन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स, वाहने, स्टीलच्या किंमती वाढणार

मराठी ई-बातम्या टीम
नवीन वर्षाची सुरुवातच आता महागाईने होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, स्टीलच्या किंमती वाढणार आहेत. यासोबतच फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स उत्पादने आणि लॉजिस्टिकसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांनी या वर्षी उत्पादनांच्या किमती ३ ते ५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आता पुढील महिन्यापासून किंमती ६ ते १० टक्के वाढतील. एफएमसीजी उत्पादनेही महागणार आहे. पुढील तीन महिन्यांत या क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किंमती ४ ते १० टक्क्यांनी वाढवणार आहेत. गेल्या ९ महिन्यांत हिंदुस्तान युनिलिव्हर,डाबर, ब्रिटानिया आणि मॅरिको यांच्यासह इतर कंपन्यांनी किंमतीत ५ ते १० टक्के वाढ केली होती.
वाहन कंपन्या १ जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हिरो आदी कंपन्यांनी जानेवारीपासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय सिट्रोन, मर्सिडीज-बेंझ आणि ऑडीसारख्या कंपन्यांनीही पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहेत.टाटाने वाहनांच्या किंमती २.५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हिरो मोटो ४ जानेवारी २०२२ पासून दुचाकींच्या किंमतीत २ हजार रुपयांनी वाढ करणार आहे.
लॉजिस्टिक कंपन्याही नवीन वर्षात भाडे वाढवतील. डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने या कंपन्यांनी यावर्षी कंटेनरच्या किंमती अनेक वेळा वाढवल्या आहेत. पोलाद कंपन्यांनीही किंमती वाढवल्या आहेत. काही महिन्यांपासून त्याचे भाव स्थिर असले तरी तिसऱ्या तिमाहीत स्टीलच्या किंमती ७७ रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या होत्या. एप्रिल २०२० मध्ये हा दर ३८ रुपये प्रति किलो होते.
डाबरने या वर्षी उत्पादनांच्या किंमती ४ टक्के वाढवल्या होत्या. तर हिंदुस्तान युनिलिव्हरने नोव्हेंबरमध्ये अशीच वाढ केली होती. यात रिन, सर्फ एक्सेलसह अनेक उत्पादनांच्या किमती वाढल्या होत्या. कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम झाल्याने अनेक उत्पादनांचे वजन कमी झाले. त्यात बिस्किटे, साबण आदींचा समावेश आहे. पार्ले कंपनी जानेवारी ते मार्च या कालावधीत उत्पादनाच्या किंमतीत ४ ते ५ टक्के वाढ करणार आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हरने त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये Rin, Surf exel, Lifebuoy, lux आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांच्या किमती ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. लाइफबॉयच्या मल्टीपॅकची किंमत ११५ रुपयांवरून १२४ रुपये करण्यात आली आहे. तर लक्स मल्टीपॅकची किंमत १४० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आली आहे. लक्स साबणाची किंमतही २८ रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्फ एक्सेलची किंमत १०८ रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही किंमत ९८ रुपये होती. एका साबणाची किंमत १६ रुपयांवरून १८ रुपयांपर्यंत वाढली आहे. महिनाभरापूर्वी २५ नोव्हेंबरला कंपनीने अशाच प्रकारे निवडक उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. त्यावेळी साबण आणि डिटर्जंटच्या किमतीत १०% वाढ करण्यात आली होती.

Exit mobile version