Marathi e-Batmya

सणासुदीच्या तोंडावर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता

ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या तोंडावर केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर पोहोचला असून वाढलेला डीए १ जुलैपासून लागू होईल. दरम्यान, सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार असून यामध्ये ६० लाखांहून अधिक पेन्शनधारकांचाही समावेश आहे.

केंद्र सरकार वेळोवेळी आपल्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता अर्थात डीए आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ करते. केंद्र सरकार वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये महागाईनुसार कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात सुधारणा करते. यापूर्वी जानेवारीत डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली होती. तर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी डीए ची गणना औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा डीए मध्ये सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना १ जानेवारी व १ जुलैपासून दिला जातो. महागाई भत्त्यात बदलाचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येतो. डीए वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन महागाई भत्त्याबाबत अंतिम निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित असते.

Exit mobile version