Marathi e-Batmya

राजशिष्टाचार विभाग आणि ‘एसआयडीएम’, ‘सीआयआय’मध्ये सामंजस्य करार

राजशिष्टाचार विभागाची परकीय थेट गुंतवणूक व प्रवासी भारतीय संपर्क शाखा (पीएफडीओ) आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आला.

संरक्षण क्षेत्रातील विमान व अवकाश उद्योग, द्वि-उपयोगी तंत्रज्ञान, अत्याधुनिक उत्पादन, निर्यात व आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योग भागीदारीसाठी महाराष्ट्राला पसंतीचे गुंतवणूक ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी सामायिक सहकार्यासंदर्भातील हा करार आहे. करारावर राजशिष्टाचार विभागाच्या परकीय थेट गुंतवणूक व प्रवासी भारतीय संपर्क विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, अवर सचिव अविनाश सोलवट, एसआयडीएमचे अध्यक्ष अरुण टी. रामचंदानी  आणि सीआयआयची पश्चिम विभागीय संचालक डॉ. अल्पा अंताणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सीआयआयचे संचालक पुष्कर हाते यावेळी उपस्थित होते.

या कराराद्वारे आंतरराष्ट्रीय संरक्षण व विमानन क्षेत्रातील प्रतिनिधिमंडळे, गुंतवणूकदार व राजनयिक संपर्क, धोरण संवाद, विषयवार परिसंवाद, आंतरराष्ट्रीय रोड शो आणि ज्ञानविनिमय कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील धोरणात्मक उत्पादन क्षेत्राला अधिक बळकटी देण्याचा उद्देश आहे.

राजशिष्टाचार विभागाची परकीय गुंतवणुक व प्रवासी भारतीय संपर्क शाखा महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून आंतरराष्ट्रीय संपर्क व गुंतवणूकदारांशी संवाद यांना प्रोत्साहन देईल, तर ‘एसआयडीएम’ आणि ‘सीआयआय’ आपल्या औद्योगिक जाळ्याद्वारे उद्योग सहभाग, विषयविशेष मार्गदर्शन आणि संस्थात्मक तसेच व्यवसायिक दुवे मजबूत करतील.

‘महाराष्ट्र डिफेन्स अँड एरोस्पेस राउंडटेबल’ आयोजित करणे, परदेशी मूळ उपकरण उत्पादक कंपन्यांशी विषयवार संवाद, राज्यातील संरक्षण क्षमता मॅपिंग, एमएसएमई व स्टार्ट-अप यांचे एसआयडीएम सदस्य कंपन्यांशी दुवे निर्माण करणे आणि संभाव्य एसआयडीएम महाराष्ट्र चॅप्टर/वर्किंग ग्रुप’ स्थापन करण्यासारख्या उपक्रमांना याद्वारे चालना मिळेल. ज्यामुळे राज्यातील संरक्षण व अवकाश उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक व औद्योगिक सहकार्याला दीर्घकालीन गती मिळेल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Exit mobile version