Marathi e-Batmya

मुंबईत ७ तर वसई-विरार मध्ये १ ओमायक्रॉन बाधित आढळले

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात नव्याने आढळून आलेल्या ओमायक्रोन बाधितांची माहिती जारी केली असून आज तब्बल ८ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे मुंबई शहरातील आहेत. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णांची संख्याची ७ आहे तर वसई-विरार येथील एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण २८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील आतापर्यंत आढळून आलेले १२, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे मनपामध्ये २ तर कल्याण डोंबिवलीमध्ये १ नागपूरमध्ये १, लातूरमध्ये १ आणि वसई विरारमध्ये १ असे आढळून आले आहेत.  यापैकी ९ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –

हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत. या ८ रुग्णांपैकी ३ स्त्रिया तर ५ पुरुष आहेत. तर हे सर्व रूग्ण २४ वर्षे ते ४१ वर्षे वयोगटातील आहेत.  यातील ३ रुग्ण लक्षणे विरहित तर ५ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत. विशेष म्हणजे प्राथमिक माहितीनुसार या पैकी कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचा इतिहास नाही.

या पैकी एकाने बंगलोर तर एकाने दिल्ली प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्ती राजस्थान मधील आहे. या ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. या पैकी ७ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एकाचे लसीकरण झालेले नाही.

Exit mobile version