Marathi e-Batmya

सोलापूरकरांना पुरेशी माहिती दिल्यानंतर संचारबंदी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून संचारबंदी लागू केली जावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी पूर्ण चर्चा करुनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संचारबंदीबाबत शहरातील नागरिकांना पुरेशी माहिती अगोदर दिली जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कोरोना प्रसार रोखण्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील काही कंटेनमेंट झोनला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या एकून घेतल्या त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे उपस्थित होते.
सोलापूर शहरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरु आहेत. राज्य शासनाने तीन तज्ञ डॉक्टरांची समिती पाठवली आहे. या डॉक्टरांशी, नागरिकांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता संचारबंदी लागू करावी, असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे नागरिक, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली जाईल, लॉकडाऊन ज्या दिवसापासून लागू केला जाणार आहे त्याच्या अगोदर किमान चार ते पाच दिवस जाहिर केला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणा सज्ज केल्या जातील आणि मगच लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील कोरोना चाचण्या वाढवणार
शहरातील कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
सोलापूर शहरातील कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी चाचण्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे यांनी सांगितले. चाचण्यांची संख्या वाढवल्यावर कोरोनाची बाधा झालेल्या नागरिकांना ओळखण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे सध्या केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या तिप्पट चाचण्या करा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या, या चाचण्या करण्यासाठी महानगरपालिकेला आवश्यक मनुष्यबळ, निधी आणि पोलीस बळ दिले जाईल, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

या चाचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किटस् येत्या तीन-चार दिवसात महानगरपालिकेला उपलब्ध होणार असल्याचे डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.

या चाचण्या सुरु करण्यापुर्वी महानगरपालिकेच्या क्वारंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यांची क्षमता वाढवा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
या बैठकीत सुधाकर शिंदे यांनी आरोग्य आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. महापालिकेच्यावतीने कॉल सेंटर स्थापन करा, या कॉल सेंटरच्या माध्यमातून को-मॉर्बिड नागरिकांवर लक्ष ठेवा, त्यांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत एसएमएस करा, यामध्ये महानगरपालिकेच्या शिक्षकांना सहभागी करुन घ्या. या मोहिमेत स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सहभागी करुन घ्या, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version