अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवी इमारतीतील शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यशही आले.
सोमवारी पहाटेच्या वेळी अति दक्षता विभागातील व्हेंटीलेटरचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर ती आग झपाटयाने पसरली. मात्र रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील इतर बालकांना सुरक्षितपणे हलविण्यास सुरुवात केली. रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आगी लागली होती. या ठिकाणी एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता विभाग आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी १३ मिळून ३९ मवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यापैकी एका कक्षाला आग लागली. या कक्षात एकूण १२ बालके होती.
नवजात शिशू कक्षाला आग लागल्याचे लक्षात येताच सेवेवर असलेल्या परिचारिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी धावपळ करून बालकांना बाहेर काढले. परंतु दुर्दैवाने तीन बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. अवघ्या वर्षभरापूर्वी नवीन इमारतीत हा नवजात शिशू अतिदक्षता विभाग करण्यात आला. या ठिकाणी कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे व गंभीर अवस्थेतील बालकांवर उपचार करण्यात येतात. मात्र आग लागल्यावर रुग्णालयातील आप्तकालीन अग्मिशमन यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील आप्तकालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे.
या दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला असून काही बालकांना पुढील उपचारासाठी जवळच सुरु विभागीय संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरु असून एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या बालकाच्या हाताला आणि पायाला भाजले असून अन्य तीन बालके किरकोळ भाजले आहेत. काही बालकांना डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती तेथील सिव्हिल डॉस्पीटलच्या डीनने दिली.
साधारणत सात वर्षापूर्वी जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या जुन्या इमारतीील नवजात बालक अतिदक्षता कक्षाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. धूर निघाल्याचे दिसताच परिचारिकांनी कक्षातील २२ बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात आले होते.
