Marathi e-Batmya

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, कर्करोगविरोधी लढ्यात एकजूटीने सहभागी व्हा

कर्करोग विरोधी लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालये, कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले.

आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, तज्ज्ञ प्राध्यापक, कर्करोग उपचार क्षेत्रातील काम करणा-या टाटा, रिलायन्स, लिलावती व इतर खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, शासकीय व खासगी रुग्णालयांतील कर्करोग उपचार तज्ज्ञ, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच दक्षिण कोरियातील आयएमबी संस्थेचे तज्ज्ञ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य आयुक्त सुनील भोकरे आणि उपसचिव विलास बेंद्रे उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, कर्करुग्ण संख्या वाढत आहे. कर्करोग उपचारांमध्ये अर्ली डिटेक्शन म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करोग प्रारंभीच्या अवस्थेत आढळल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे राज्यभर जनजागृती, निदान व उपचार या त्रिसूत्रीच्या आधारे कर्करोगा विरोधात लढाई सुरू आहे. कर्करोग तपासणीसाठी राज्यातील आठ परिमंडळात प्रत्येक एक कर्करोग निदान व्हॅन द्वारे तपासणी सुरू असून, आतापर्यंत तीन कोटीपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. कर्करुग्णांच्या उपचारासाठी राज्यात २७ ठिकाणी डे केअर युनिट सुरू करण्यात येत आहेत.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्यात १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू असून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी ही मोहीम आहे. कर्करोग उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार पॅकेजचे पुनरावलोकन करण्यात आले असून रेडिओथेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी, पीईटी स्कॅन यांसारख्या उपचारांचा अधिक व्यापक समावेश करण्याचे शासनाचे नियोजन आहे. तसेच महाराष्ट्र कर्करोग वॉरियर्स (MCW) या उपक्रमाच्या माध्यमातून तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्टच्या मदतीने निदान व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगितले.

प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले की, सर्व प्रकारच्या कर्करोगाचे लवकर आणि अचूक निदान करण्यासाठी जगातील काही देशात लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानाबाबतचे दक्षिण कोरियामधील आयएमबी संस्थेच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

कर्करोग निर्मूलनाच्या कार्यात सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच सर्व खासगी रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास कर्करोग निर्मूलनाचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

Exit mobile version