Marathi e-Batmya

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, राज्यात ‘हब आणि स्पोक मॉडेल’ द्वारे अवयवदान व प्रत्यारोपण चळवळ व्यापक करा

महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भाईदर व मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात अवयव प्रत्यारोपण उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले, राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली पाहिजे आणि अधिकाधिक रुग्णांना वेळेत अवयवरुपी नवजीवन मिळाले पाहिजे. त्यासाठी शासकीय रुग्णालयांमधील अवयवदान प्रक्रिया अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. विशेषतः ब्रेन-डेड (मेंदू मृत) रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रभावी समुपदेशन करून अवयवदानासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी आशा आहे. हे पुण्याईचे आणि नवजीवन देण्याचे कार्य असल्याचा दृष्टिकोन समाजात रुजवला गेला पाहिजे, अवयवदान चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असून, दात्यांची संख्या वाढविण्यासाठी राज्यभर जनजागृती, समुपदेशन आणि संस्थात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे सांगितले.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्यातील सर्व उपसंचालकांनी विभागस्तरावर अवयवदानाबाबत राज्यभर विशेष जनजागृती मोहीम राबवावी. संदर्भित रुग्णालयात अवयवदान समुपदेशन व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती/प्रशिक्षण करून प्रत्यारोपण सेवेला गती द्यावी. अवयवदान विषयक कार्यशाळा,  जनजागृती मेळावा आणि प्रशिक्षण सत्रे नियमित आयोजित करावीत. राज्यातील ब्रेन-डेड प्रकरणांचा दर दोन महिन्यांनी आढावा घ्यावा, असे निर्देशही दिले.

या बैठकीत संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, औध सिव्हिल हॉस्पिटल पुणे, ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, पं. भीमसेन जोशी हॉस्पिटल मीरा-भाईदर, या रुग्णालयानी अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील कार्याचे सादरीकरण केले.

वाडिया रुग्णालयाने लहान मुलांच्या लिव्हर ट्रान्सप्लांट क्षेत्रातील कामाचे सादरीकरण केले. तसेच टेलिमेडिसिनच्या माध्यमातून राज्यातील विविध रुग्णालयांना तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती दिली.

राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी सहा प्रादेशिक हब तयार करून प्रत्यारोपण सेवा अधिक बळकट करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Exit mobile version