Marathi e-Batmya

अ.नगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत: आठवड्यात चौकशी अहवाल

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनावरील उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचावलेल्या रूग्णांना वेळेत उपचार मिळतील याकडे रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष देण्याचे आदेश देत आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची आर्थिक मदत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केली.

तसेच या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येणार असून त्याचा अहवाल आठभरात राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ५ लाख रूपयांबरोबर आणखी २ लाख रूपये असे मिळून ७ लाखाची मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले.

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ११ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेतून ६ जणांना वाचविण्यात यश आले आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्यामुळे मोठी खळबळ माजली. दरम्यान, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचविण्यात यश आले. मात्र यात एकजण गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा कालांतराने मृत्यू झाल्याची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Exit mobile version