Marathi e-Batmya

तळवडे घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

तळवडे घटेनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही मदत करण्याबाबत सूचना दिल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच गंभीर जखमी रूग्णांना तात्काळ उत्तोमत्तम उपचार द्यावे असा सूचना देऊन, रूग्णांची प्रकृती सुधारावी आणि ते लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावनाही व्यक्त केल्या.

तळवडे येथील स्पार्कल कॅन्डल बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट होवून लागलेल्या आगीत भाजलेल्या दहा जखमींना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. या रूग्णांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ससून रूग्णालयाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. घटना दुर्दैवी आहे, त्या संदर्भात सर्किट हाऊस याठिकाणी बैठक घेऊन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

औद्योगिक वसाहतीमध्ये कुठलही परवानगी न घेता महापालिका क्षेत्रात मिळेल त्या जागेत उद्योग उभे राहत आहेत. अशा अनियमित उद्योगांचे सर्वेक्षण करून नियमतीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रामुख्याने कोणत्या भागात धोकादायक कंपन्या, कारखाने आहेत हे या सर्व्हेक्षणातून समोर येणार आहे.

दरम्यान, या सर्वेक्षणाचे निरीक्षण अधिवेशनात मांडून सरकार पाठपुरावा करेल. तसेच घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना धीर देत, त्यांच्या घरातील लहान मुले किती, त्यांचे शिक्षण यासह पुढील संगोपन आणि पुर्नवसनासाठी काम करण्यात येईल. त्यासाठी सामाजिक सरक्षा योजना राबविण्यात येणार असल्याचे डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

पुढे बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील आपत्तीजनक उद्योग आहेत, त्याची पाहणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश सर्वेक्षण आपत्ती व पुर्नवसन विभागाला दिले आहेत, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नगरविकास आणि महापालिकेनेही विशेष मोहिम राबविणे आवश्यक आहे मत यावेळी व्यक्त केले.

Exit mobile version