राजीनामा स्विकारण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटके लगावल्यानंतर अखेर आज सकाळी मुंबी महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सकाळी ऋतुजा लटके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत गुंदवली येथील शाळेत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने अर्ज भरला. तर भाजपाने माजी अपात्र नगरसेवक मुरजी पटेल यांना अधिकृत उमेदवारी आज दुपारी जाहिर करण्यात आली. यावेळी भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्यामुळे या निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाचे अनेक आमदार, मंत्री उपस्थित होते. तसेच कार्यकर्त्यांची मोठी फौजही होती.
एक दोन वेळेस शिंदे गटाचे आमदार उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सामोरे गेल्याने शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओक्के अशा घोषणा दिल्या. तसेच गद्दार म्हणून घोषणा दिल्या. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मात्र आधी ऋुतुजा लटके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपाच्यावतीने भरला.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. यावेळी नितेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्या मशाल निशाणीवर बोलताना म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्यातील मशाल विजलेली आहे. कदाचित ते माहित असल्याने निवडणूक आयोगाने त्यांना मशाल हे चिन्ह दिले आहे. मात्र प्रत्यक्षात ती मशाल नाही तर आईस्क्रिमचा कोन असल्याची खोचक टीका केली.
त्यास प्रत्युत्तर देताना उध्दव ठाकरे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर म्हणाले, मशाल नाही आईस्क्रीमचा कोन आहे तर तोंडात घ्या असा खोचक टोला लगावत ते पुढे म्हणाले की, तोंडात गेल्यानंतर कळेल की ती मशाल आहे की आईस्क्रिमचा कोन आहे असे प्रत्युत्तरही दिले.
तर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, ती शिवसेना नाही तर रडकी सेना आहे. ते कधी एकनाथ शिंदेंच्या नावाने रडतात, तर कधी निवडणूक आयोगाच्या नावाने रडतात तर कधी भाजपाच्या नावाने रडतात. त्यामुळे ती शिवसेना नाही तर रडकी सेना असल्याची टीका केली.
