भारतीय जनता पार्टीचा विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचंड दबाव आणि कडाडून विरोध असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला आणि सना मलिक यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत अजित पवार सहभागी झाले. अजित भाजपाच्या दबावाला अजिबात बळी पडले नाहीत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नवाब मलिक यांना देऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड दबाव आणला होता. मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू नये, आमचा त्यांना विरोध असेल, अशी भूमिका भाजपने निवडणूकीपूर्वी जाहीर केलेली होती. परंतु भाजपचा आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांचा विरोध डावलून अजित पवार यांनी नवाब मलिक यांना पद्धतशीरपणे शेवटच्या क्षणाला तिकीट देऊन एबी फॉर्म दिला.
नवाब मलिक यांच्या उमेदवारीने बॅकफूटला गेलेल्या भाजपाने नंतर ते जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करू, अशी भूमिका घेतली. मात्र गुरूवारी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मलिक यांच्या प्रचारासाठी रॅलीला उपस्थित राहून पुन्हा भाजपाला आव्हान दिले.
अणुशक्ती नगर मतदार संघाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सना मलिक आणि मानखुर्द गोवंडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी आज गोवंडी टाटा नगर परिसरातून प्रचार रॅली केली. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला घेऊन युतीमध्ये जोरदार विरोध होता. तरी नवाब मलिक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यात आता खुद्द अजित पवार हेच प्रचारात उतरल्यामुळे युतीत नाराजी होण्याची शक्यता बळावली आहे. या दरम्यान नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याने आमचा त्यांना पाठिंबा नाही, हे आम्ही याआधीच जाहीर केले आहे. सना मलिक महायुतीच्या उमेदवार असल्याने त्यांचा प्रचार करण्यात काही गैर नाही. नवाब मलिकांना आमचा पाठिंबा नाही, हे आम्ही कित्येक वेळा सांगितले आहे. सना मलिक महायुतीच्या उमेदवार असतील तर त्यांना समर्थन देणे आमचे काम आहे, असे भाजपाच्या प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच या गोष्टीमुळे आमच्या युतीत बाधा येणार नसल्याचेही स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनीही अणुशक्तीनगर मध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे.
