Marathi e-Batmya

­­बदलापूर् अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एनकांऊटर

बदलापूर येथील आदर्श शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांने पोलिसांच्या ताब्यातील पिस्तूल हिसकावून घेत पोलिसांवरच गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी प्रत्युतरा दाखल केलेल्या पोलिस फायरिंगमध्ये अक्षय शिंदे हा मृत्यूमुखी पडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बदलापूर पूर्वेला असलेल्या आदर्श शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यांने दोन चिमुरडींवर लैगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे याप्रकरणातील आदर्श शाळेशी संबधित ट्रस्टी हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी आणि भाजपाशी संबधित असल्याचे उघडकीस आले होते. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठीही आणि पोलिस प्रशासनाकडून तक्रार दाखल करून घेण्यासाठी भलतीच चालढकल करण्यात आल्याच्या अनेक गोष्टी बाहेर आल्या.

अखेर पोलिस काहीच करत नसल्याचे पाहून बदलापूरातील रहिवाशांनी स्वयंपूर्तीने रस्त्यावर उतरून एक दिवसाचे रेल रोको आंदोलन केले, त्याशिवाय शाळेच्या विरोधात निदर्शनेही केली. अखेर बदलापूर रहिवाशांच्या या आक्रमक भूमिकेसमोर पोलिसांनी माघार घेत अक्षय शिंदे याला अटक केली. मात्र या या प्रकरणी सत्ताधारी पक्षाचे आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष म्हात्रे यांनीही काही महिला पत्रकारांना धमकाविण्याचे प्रकरण उघडकीस आले.

त्यानंतर अक्षय शिंदे यास पोलिसांनी अटक केली. तसेच राज्य सरकारकडूनही अर्थात शालेय शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना करून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरु केली. या चौकशीत शाळेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज गायब झाले होते अशी माहिती पुढे आली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

त्यानंतर अक्षय शिंदे यांच्या विरोधात पुढील कारवाई सुरु झाली. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूरातील अत्याचाराचे प्रकरण सत्ताधारी भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला भारी पडणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बदलापूरातील अत्याचार प्रकरणी असलेला जनतेतील संताप आणि रोष कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून काही तरी पर्याय शोधण्यात येत होता.

दरम्यान, आज संध्याकाळी अक्षय शिंदे याला ठाणे क्राईम ब्रॅंचच्या ताब्यात देत असताना एपीआय निलेश मोरे यांच्याकडील पिस्तुल अक्षय शिंदे यांने हिसकावून घेऊन गोळीबार केला. यात निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले पोलिस अधिकाऱ्यांनी अक्षय शिंदे यांच्यावर स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यावर तीन राऊंड फायर केल्या आणि त्यात तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यातच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

Exit mobile version